अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट

By Admin | Published: October 7, 2016 12:31 AM2016-10-07T00:31:12+5:302016-10-07T00:43:01+5:30

यात्रा उत्साहात : कोहळा मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड

Visit to Ambabai-Trimboli Devi | अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट

अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट

googlenewsNext

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (गुरुवारी) ललिता पंचमीनिमित्त त्र्यंबोली टेकडी येथील मंदिरात श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या सखींची भेट घडविण्यात आली. खासदार युवराज संभाजीराजे व यशराजराजे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. मयूरी संतोष गुरव या कुमारिकेचे पूजन झाल्यानंतर तिच्या हस्ते कोहळा भेदन विधी पार पडला. कोहळा घेण्यासाठी कोणताही गोंधळ-गडबड न होता ही यात्रा शांततेत पार पडली.
त्र्यंबोली यात्रेनिमित्त पहाटे अडीच वाजता देवीचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर त्र्यंबोली देवीची सिंहासनस्थ पूजा बांधण्यात आली. ही पूजा शिवप्रसाद गुरव, सदानंद गुरव, रोहित गुरव, संतोष गुरव यांनी बांधली. अंबाबाई मंदिरात सकाळी १० वाजता अंबाबाईचे धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई तसेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानीदेवी, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तुळजाभवानी देवीच्या पादुका असलेल्या व गुरुमहाराजांच्या पालख्यांनी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान केले. कोटीतीर्थ, टाकाळा येथील तीर्थांचे पूजन करण्यात आले. भाविकांकडून आरती स्वीकारत दुपारी सव्वाबारा वाजता सर्व पालख्यांचे त्र्यंबोली टेकडीवर आगमन झाले. येथे देवीसाठी रांगोळींचा आणि फुलांचा गालिचा तयार करण्यात आला होता. बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर देवतांच्या उत्सवमूर्ती त्र्यंबोली देवीच्या गाभाऱ्यात नेण्यात आल्या. खासदार युवराज संभाजीराजे व यशराजराजे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. कोहळा भेदन विधीचा परंपरागत मान धोंडिराम महादेव गुरव घराण्याकडे आहे. या घराण्यातील मयूरी संतोष गुरव या दहा वर्षांच्या कुमारिकेचे पूजन करण्यात आले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदन विधी झाला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडविण्यात आली. यावेळी श्रीपूजक अजित ठाणेकर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, गुरुमहाराज वाड्यातील सर्व मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.
कोहळा भेदन विधी झाल्यानंतर त्याचा तुकडा घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची पळापळ होत असते. काही वेळा पोलिसांना लाठीमार करावा लागतो. यंदा मात्र असा कोणताही प्रकार न होता यात्रा शांततेत पार पडली. एक भाविक किरकोळ जखमी झाला; तर दुसऱ्या एकाने कोहळा गिळल्याने त्याला त्रास झाला. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. दुपारी चारनंतर अंबाबाईची पालखी पुन्हा मंदिरात आली. (प्रतिनिधी)


भाविकांकडून जल्लोषी स्वागत
अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली टेकडी या पालखी मार्गावर कोल्हापूरकरांकडून अंबाबाईच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत होते. आकर्षक रांगोळी, फुलांचा गालिचा देवीसाठी तयार करण्यात आला होता. देवीची पालखी आली की भाविकांकडून औक्षण केले जात होते. फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. बागल चौक मित्रमंडळ, राजारामपुरी, समाजसेवा मित्र मंडळ, इंडियन फ्रेंड्स सर्कल, न्यू कमांडो फ्रेंड्स सर्कल, टाकाळा मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ यांच्याकडून पालखीचे जल्लोषी स्वागत केले जात होते. तसेच पालखीसोबतच्या मानकऱ्यांसाठी फराळ, पाणी, सरबताचीही सोय करण्यात आली होती.
यायला लागतंय...
येत्या १५ तारखेला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचा ज्वर त्र्यंबोली यात्रेतही दिसून आला. येथे काढण्यात आलेल्या रांगोळीत १५ आॅक्टोबरला ‘यायला लागतंय...’ असा संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली होती.

Web Title: Visit to Ambabai-Trimboli Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.