आवाडेंची टेक्स्टाईल आयुक्तांशी भेट
By admin | Published: July 20, 2016 11:31 PM2016-07-20T23:31:47+5:302016-07-21T01:04:10+5:30
वस्त्रोद्योगातील अडचणी : मंदी, उपाययोजनांबाबत केली चर्चा
इचलकरंजी : पीडीईएक्सएलचे संचालक सुनील पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली टेक्स्टाईल आयुक्त कविता गुप्ता यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी प्रकाश आवाडे म्हणाले, गेल्या महिन्यापासून या व्यवसायाची अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरेच उद्योजक आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. काही उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. अशीच परिस्थिती आणखीन काही महिने राहिली तर यंत्रमाग उद्योग पूर्णपणे बंद पडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणून सुताच्या दरावर नियंत्रण ठेवणे, कापडाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, आयात कापडावर कर आकारणी करावी. यावर गुप्ता यांनी, कार्यालयीन प्रतिनिधींनीसोबत इचलकरंजीला भेट दिलेली आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर उपाययोजना करता येतील. ते पाहून योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)