विठ्ठल-बिरदेव यात्रेस थाटात प्रारंभ
By admin | Published: November 1, 2015 12:43 AM2015-11-01T00:43:53+5:302015-11-01T00:57:42+5:30
फरांडेबाबांची भाकणूक : पट्टणकोडोलीत लाखो भाविकांची उपस्थिती
पट्टणकोडोली : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात ‘श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात फरांडेबाबांनी ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकही झाली.
फरांडेबाबा (खेलोबा वाघमोडे) ‘हेडाम’ खेळत मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. ‘श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत त्यांनी भाकणूक केली.
‘रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा धारण, मणाची धारण खळ्याकाठी पोतं दोन-अडीच, रोगाचा कमी-अधिक प्रमाणात, भक्तगण जो माझी सेवा करील त्यावर माझ्या कांबळ्याची छाया असेल, राज्यात गोंधळ होईल; पण नंतर शांतता नांदेल, अशी भाकणूक फरांडेबाबांनी केली.
फरांडेबाबा मंदिरासमोरील दगडी गादीवर विराजमान झाले होते. सकाळपासून ढोलवादनाने परिसर दणाणून गेला. भंडारा, खारका, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. मंदिर परिसर सुवर्णमय झाल्यासारखा भासत होता.
मुख्य धार्मिक विधीस दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. गावचावडीत गावकामगार पाटील प्रकाश पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे, शस्त्रांचे पूजन झाले. यावेळी मानकरी, गावडे, चौगुले, कुलकर्णी, समस्त पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ उपस्थित होते. भानस मंदिरात व श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मानकऱ्यांनी फरांडेबाबांना निमंत्रित केले. त्यांच्याबरोबर मानाचा घोडा, छत्र्या, ढोल, कैताळांचा लवाजमा होता. परंपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन निमंत्रित केले. यावेळी भंडाऱ्याची उधळण सुरू होती.
फरांडेबाबा हातात तलवार घेऊन दुपारी अडीच वाजता उभे राहिले. यावेळी चांगभलं’चा अखंड गजर सुरू होता. ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक स्तब्ध झाले. मानाच्या छत्र्या फरांडेबाबा यांच्यावर फिरविण्यात आल्या. त्यानंतर पोटावर मानाच्या तलवारीचे वार करीत फरांडेबाबा हेडाम खेळत प्रदक्षिणा घालून मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. भाकणूक झाल्यानंतर फरांडेबाबा दर्शन घेऊन मंदिरामागील दगडी गादीवर विराजमान झाले.
भाकणूक सोहळ्यादरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, कागल मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांचा प्रचंड ताफा या भागात होता. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या, तर तात्पुरते बसस्थानकही उभारले होते. महावितरण कंपनीने अखंडित वीजपुरवठा केला होता. मंदिर परिसरात भंडारा, खारका, नारळ, भांडी, खेळणी, मेवामिठाई, घोंगडे यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. जागोजागी बाहेरगावच्या भाविकांनी धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सादर झाले. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे व हुपरी पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)