विवेकानंद घाटगे यांचा न्यायरक्षक पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:46 AM2021-02-28T04:46:09+5:302021-02-28T04:46:09+5:30
कोल्हापूर : नीतिमत्तेवर कायदे तयार केले आहेत, किंबहुना नीतिमत्तेपासून काहीजण दूर गेल्यानेच कायद्यांची निर्मिती करावी लागली, असे प्रतिपादन निवृत्त ...
कोल्हापूर : नीतिमत्तेवर कायदे तयार केले आहेत, किंबहुना नीतिमत्तेपासून काहीजण दूर गेल्यानेच कायद्यांची निर्मिती करावी लागली, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी शनिवारी येथे केले. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांना नीतिप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शाहू स्मारक भवानात ॲड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
एस. पी. कुलकर्णी म्हणाले, न्याय व्यवस्था, वकील आणि पक्षकार यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असते. पक्षकाराला न्याय मिळाला पाहिजे. प्रवाहाविरुद्ध जे लढतात त्यांना यातना सोसाव्या लागतात. यामध्ये जे डगमगत नाहीत तेच खरे समाजसेवक ठरतात. ॲड. घाटगे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ॲड. महादेवराव आडगुळे, अनिल म्हमाने, प्रा. करुणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड. प्रशांत चिटणीस, चिंतामणी कांबळे, अकबर मकानदार, डॉ. दयानंद ठाणेकर, मंदार पाटील, आदी उपस्थित होते.
चौक़ट
‘कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये’ असे म्हणणे चुकीचे आहे. कोर्टाची पायरी चढल्याशिवाय न्याय मिळत नाही. सर्व पर्याय संपल्याने लोक कोर्टात दाद मागण्यासाठी येतात. त्यांना न्याय मिळवून देणे वकिलांचे आणि न्यायव्यवस्थेचे कर्तव्य असते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.