स्वामी विवेकानंद आध्यात्मिक केंद्रात विवेकानंद जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:56 AM2020-01-13T11:56:57+5:302020-01-13T11:58:16+5:30
कोल्हापूर येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कोल्हापूर : येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
श्री स्वामी विवेकानंद या महापुुरूषाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवार पेठेतील आश्रम व आध्यात्मिक केंद्रामध्ये जयंती साजरी करण्यात आली. सकाळी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी भागातील महिलांनी पाळणा पूजन करून जन्मोत्सव साजरा केला. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. गितांजली पाटील यांनी श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मार्गदर्शनातून उपस्थितांसमोर ठेवले. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा. पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांनीही मार्गदर्शन केले. तर विश्वस्त मनोहर साळोखे यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त, कार्यकर्ते व भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.