विवेकानंद ‘धर्मप्रचारक’ ही चुकीची मांडणी
By admin | Published: February 12, 2015 12:17 AM2015-02-12T00:17:32+5:302015-02-12T00:21:36+5:30
दत्तप्रसाद दाभोलकर : कविता सातव यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान
कोल्हापूर : विवेकानंद हे समाजवादी आणि परिवर्तनाचे दूत होते. घृणास्पद जातिव्यवस्था, हिंदू-मुस्लिमांमधील सामाजिक खुन्नस आणि स्त्री-पुरुष असमानतेवर त्यांनी प्रहार केला. ज्योतिष्याची खिल्ली उडविली. धर्मात शाश्वत असे काहीच नसते, असे मानणाऱ्या विवेकानंदांनी धर्माचा आधार घेऊन परिवर्तनाची दिशा मांडली. मात्र, आपण त्यांना धर्मप्रचारक मानत त्यांच्या विचारांची चुकीची मांडणी केल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी येथे केले. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आंतरभारती शिक्षण मंडळ व पाटगावकर कुटुंबीयांच्यावतीने डॉ. कविता सातव यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान केला. यावेळी दाभोलकर यांनी ‘स्वामी विवेकानंद आपणांस खरोखर समजले आहेत का?’ या विषयावर विवेचन केले. यावेळी विनय पाटगावकर, एम. एस. पाटोळे, तनुजा शिपूरकर, सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, सुचेता पडळकर उपस्थित होत्या. रोख २५ हजार, शाल सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. दाभोलकर म्हणाले, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद हे समाजसुधारणा या एकाच उद्दिष्टासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत होते. दुसरीकडे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि ते टिकविण्यासाठीची पिढी निर्माण करायची होती; पण विवेकानंदांबद्दल धर्मप्रसारक अशी अपुरी, एकांगी, चुकीची आणि काही प्रसंगी विकृत माहिती पसरविण्यात आली आहे. विवेकानंद स्वत: म्हणत की, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या गाळात रुतून बसलेल्या २० कोटी भारतीयांना मुक्त करायचे आहे. त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली, चमत्कार नाकारले. कविता सातव म्हणाल्या, मी माझ्या आई-बाबांना स्वत:ला झोकून देऊन समाजकार्य करताना बघितले आहे. नेत्ररोगतज्ज्ञ झाल्यानंतर काहीही झालं तरी जनरल प्रॅक्टिस करायची नाही, हा माझा निर्धार मेळघाटातील परिस्थिती पाहिल्यानंतर गळून पडला. तिथे मी डॉ. अभय बंग यांचे कुपोषणावर सुरू असलेले काम पाहत होते. सुविधांअभावी बालके दगावताना पाहिली. या नागरिकांसाठी काम करायचे ठरवून गावागावांत आरोग्यदूत निर्माण केले. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करू शकलो. आज मिळालेला हा पुरस्कार आम्हाला सहकार्य करणाऱ्या टीमला मिळालेली शाबासकी आहे.