मुंबई मोर्चात कोल्हापूरचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:38 AM2017-08-10T00:38:50+5:302017-08-10T00:38:54+5:30

The voice of Kolhapur in the Mumbai Morcha | मुंबई मोर्चात कोल्हापूरचा आवाज

मुंबई मोर्चात कोल्हापूरचा आवाज

googlenewsNext



प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एक मराठा... लाख मराठा... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... कोपर्डीतील दुर्दैवी लेकीला न्याय मिळालाच पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाज बुधवारी मराठा क्रांती महामोर्चासाठी आझाद मैदानावर एकवटला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, साताºयासह बेळगाव, सीमाभागातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने पोवाडा सादर करून मोर्चेकºयांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.टी.) ते आझाद मैदान असा रोड शो करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला.
सळसळता उत्साह प्रत्येक मराठा बांधवाच्या चेहºयावर (बुधवारी) मोर्चासाठी येताना दिसत होता. या मोर्चासाठी गेल्या चार दिवसांपासून मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने मुंबईला येत होते. मंगळवारी रात्रीपासूनच मराठा बांधव खासगी वाहनांसह रेल्वेने मुंबईत दाखल झाले.
भायखळा येथील जिजामाता पार्क येथून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सी.एस.टी. ते आझाद मैदानापर्यंत कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत व त्यांचे सहकारी संजय गुरव, संभाजी पाटील, सुदर्शन ढाले, आदींनी ढोलकी, डफ, तुणतुण्याच्या साथीने रोड शो करीत मोर्चेकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या ‘जाग सरकारा जाग... मराठा क्रांतीची पेटली ही आग’ या पोवाड्याने सर्वांचे लक्ष वेधले.
मोर्चासाठी कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील मराठा बांधव खासगी वाहने, एस.टी.बस, आरामबस, रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून दाखल होत होते. वाशी परिसरातील ए.पी.एस.सी. मार्केट येथे कोल्हापूरच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यासह भिवंडी परिसरात वाहने लावून मराठा बांधव लोकल ट्रेनने सी.एस.टी.कडे येत होते. हजारो लोक बुधवारी सकाळपर्यंत मोर्चासाठी दाखल झाले.
मोर्चाच्या नियोजनासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापुरातून सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीचे सदस्य मुंबईत तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर मराठा मावळेही या ठिकाणी आले आहेत. मोर्चावेळी या मावळ्यांनी नेटके नियोजन करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला. कोल्हापूरचा मराठा मोर्चा यशस्वी पार पाडून योग्य नियोजन केल्याने कोल्हापुरातील नियोजनातील टीमला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या अनुभवाचा या मोर्चावेळी चांगलाच उपयोग झाल्याचे दिसून आले.
बेळगाव-खानापूर येथील तीन हजारांहून अधिक मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले. बेळगावचे आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी पांढºया टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर ‘बेळगाव कुणाचे? तर महाराष्ट्राचे’ असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे सीमाभागातील मराठा बांधवांचा हा आवाज या ठिकाणी घुमल्याचे दिसून आले.

मराठा क्रांती महामोर्चासाठी मुंबईतील आझाद मैदानावर कोल्हापूर, सांगली, साताºयासह बेळगाव, सीमाभागातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने पोवाडा सादर करून मोर्चेकºयांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.टी.) ते आझाद मैदान असा रोड शो करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला. दोनवडे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील इयत्ता चौथीत शिकणाºया सई पुंडलिक पाटील या चिमुरड्या रणरागिणीने मुंबईच्या मोर्चात आपल्या आक्रमक शैलीने सर्वांची मने जिंकली. आता मराठाच मराठ्यांना वाचवेल, यासाठी सर्वांनी एकत्रित राहिले पाहिजे, असे आवाहन तिने केले.

मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील मराठा मावळ्यांचे हात राबले. यामध्ये संदीप पाटील, उमेश पोवार, खजिल पार्टे, धैर्यशील देसाई, हृषीकेश देसाई, स्वप्निल पाटील, हृषीकेश पाटील, प्रतीक गायकवाड, अमोल गायकवाड, यांच्यासह पाचशेहून अधिक मराठा मावळे कार्यरत होते. त्यांच्याकडे आझाद मैदान येथील नियोजनाची जबाबदारी होती. ती त्यांनी चोखपणे पार पाडली.
मोर्चातील कोल्हापूर
मोर्चासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, राजू लिंंग्रस, सचिन तोडकर, चंद्रकांत जाधव, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, राजू बाबदार, बाबासो गायकवाड, पै. विष्णू जोशीकर, गजानन तोडकर, बाळासाहेब मुधोळकर, विनायक फाळके, माणिक मुळीक, नाना जाधव, मनोज जाधव, गायत्री राऊत, आदी हिरिरीने सहभागी झाले होते.

आम्ही आलोय मुंबईला ।
आम्ही आलोय मुंबईला।
आमचा हक्क मागायला।
जागं कराय सरकारला ।।

भगवा झेंडा खांद्याला
भाजी भाकरी कमरेला।
आरक्षण विना आज
माघार नाही गावाला
आम्ही आलोय मुंबईला ।
आम्ही आलोय मुंबईला।
आमचा हक्क मागायला ।
जागं कराय सरकारला।।

शेतकरी ओसाड माळाला
पाणी नाही शेताला।
गाव सोडला कोसाला
मरन तुमच्या दाराला ।।
आम्ही आलोय मुंबईला ।
आम्ही आलोय मुंबईला।
आमचा हक्क मागायला ।
जागं कराय सरकारला ।।
- शाहीर दिलीप सावंत

Web Title: The voice of Kolhapur in the Mumbai Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.