व्हॉटस् अॅपच्या ग्रुपवर शब्दसाहित्याची मैफल...
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:32+5:302015-12-15T00:46:15+5:30
प्रतिभाशक्तीचा नवा पैलू : राज्यभरातील साहित्यिकांचे विचारमंथन; साहित्यिक कक्षा रुंदावताहेत
दत्ता पाटील- तासगाव -‘नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञाह प्रतिभा’ हा संस्कृत अलंकार साहित्यिकांच्या बाबतीत नेमकेपणाने लागू पडतो. या अलंकारिक प्रतिभाशक्तीचा एक नवा पैलू व्हॉटस् अॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही समोर आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यिकांनी ‘शब्दसाहित्य विचार मंच’ या नावाने वर्षभरापूर्वी एक ग्रुप सुरू केला. या ग्रुपवर राज्यभरातील नामवंत, तसेच नवोदितांची बहारदार मैफल होत आहे. एरवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भेटणाऱ्या साहित्यिकांचे व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून रोजच साहित्यमंथन होत आहे.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच वस्त्रे यत्न करू’, या संत तुकारामांच्या अभंगवाणीनुसार शब्दांवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांना यापूर्वीच्या काळात राजाश्रय असायचा. राजेही गेले आणि राजाश्रयही गेला. मात्र लोकाश्रय कायम राहिला. साहित्यप्रेमींना साहित्यिक मेजवानी देण्यासाठी लोकाश्रय कामी आला. लोकाश्रयाच्या निमित्ताने राज्यभरातील लेखकांचा एखाद्या ठिकाणी मेळा भरतोच. यानिमित्ताने सर्वच क्षेत्रातील लेखकांची केव्हा तरी गाठभेट व्हायची. सातत्याने एकमेकांना भेटणे साहित्यिकांसाठी तसे खर्चिकच. मात्र सोशल मीडियात व्हॉटस् अॅपचा शिरकाव झाल्यामुळे साहित्यिकांनीही ‘सोशल’ प्रतिभाशक्तीचा वापर सुरू केल्याचे चित्र आहे.
कर्नाळ (ता. मिरज) येथील कवी सचिन पाटील यांनी राज्यभरातील कवी, साहित्यिकांना एकत्रित करून वर्षभरापूर्वी एक ग्रुप सुरू केला. या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यिक एकमेकांशी जोडले गेले. त्यावर साहित्यिक, वैचारिक मंथन, नवनिर्मित साहित्याचा उहापोह, साहित्यिक घटनांचा मागोवा घेत, साहित्याची बहारदार मैफलही रंगवली जात असल्याचे चित्र आहे. एरवी अपवादाने भेटणाऱ्या साहित्यमित्रांची ग्रुपच्या माध्यमातून रोजच भेट होत असून, साहित्यिक कक्षा रुंदावत आहेत.
‘शब्दची आमुच्या जिवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका
तुका म्हणे पाहा शब्दची हा देव
शब्देची गौरव पूजा करू’
हा तुकारामांचा अभंग सार्थ ठरविण्याचे काम शब्दसाहित्य ग्रुपच्या माध्यमातून गेले वर्षभर सुरू आहे.
फेसबुकवरही पेज
व्हॉटस् अॅप ग्रुपबरोबरच फेसबुकवरही अनेक साहित्यिकांनी साहित्यिक पेज निर्माण केले आहे. या पेजच्या माध्यमातूनही साहित्यिक विचारांची देवाण-घेवाण होत असल्याचे चित्र आहे. अनेक नवोदित साहित्यिकांसह नामवंत, ज्येष्ठ साहित्यिकही आपले साहित्य रसिकांपर्यंत पोहोचविण्यास सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहेत.
दिवाळी अंकातील लिखाण आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राज्यभरातील साहित्यिकांची ओळख झाली. समविचारी मित्र एकत्र आल्यामुळे पुढे दृढ संबंध प्रस्थापित झाले. यापूर्वी वर्षातून दोन-चार वेळेसच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने किंंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठभेट होत होती. मात्र आता व्हॉटस् अॅप ग्रुपमुळे आम्ही सर्व साहित्यिक सहकारी एकमेकांशी ‘कनेक्टेड’ असून या ग्रुपच्या माध्यमातून साहित्य कलाकृतींचा आस्वाद घेता येत आहे.
- सचिन पाटील, कवी, गु्रप अॅडमीन, कर्नाळ (ता. मिरज)
सल्लुभाई... सल्लुभाई...
विचार मंच ग्रुपचे सदस्य परभणीचे कवी अशोक देशमाने यांनी चालू घटनांचा वेध घेत, ‘शांताबाई’ या गीतावर आधारित ‘सल्लुभाई’ या विडंबनात्मक काव्याची निर्मिती केली. त्यांची ही साहित्यिक रचना सोशल मीडियावर चर्चेत असली तरी, त्याची सुरुवात विचार मंच ग्रुपवर शेअर करून झाली. विडंबनात्मक काव्याचा थोडासा नमुना पुढीलप्रमाणे...
‘‘सल्लूचा जलवा, फुटपाथ हलवा,
जिवाचा कालवा, वकील बोलवा,
साक्षीदार भुलवा, कालवा-हलवा,
कालवा-हलवा, कालवा-हलवा,
सल्लुभाई, सल्लुभाई, सल्लुभाई, सल्लुभाई...’’