कोल्हापुरात वळवाची हजेरी
By admin | Published: May 28, 2014 12:57 AM2014-05-28T00:57:50+5:302014-05-28T00:58:05+5:30
जिल्ह्यातही पाऊस : शहरात तासभरात पाणीच-पाणी
कोल्हापूर : सकाळपासून अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारांमुळे बेजार झालेले कोल्हापूरकर आज, मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या वळवाच्या पावसाने सुखावून गेले. पावसाने सुमारे तासभर जोरदार हजेरी लावल्याने शहरात पाणीच पाणी झाले होते. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे उष्मा वाढून घामाघूम झालेले नागरिक शीतपेये व थंडगार पाण्याचा आधार घेत होते. दुपारी तीनपर्यंत अंगाची लाही-लाही करणार्या उन्हामुळे घरातून बाहेर पडणेही नागरिकांच्या जीवावर आले होते. त्याचबरोबर घरात थांबूनही पंख्यांचे वारेसुद्धा गारवा न देणारे होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अचानक ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडण्याची चाहूल लागली. काही वेळांतच पावसाने प्रत्यक्ष हजेरीही लावली. बघता-बघता पावसाने जोर धरला. यावेळेस नागरिकांची धावपळ उडाली तर या पावसाचा बच्चेकंपनीने मनमुराद आनंद लुटला. दिवसभर गर्मी आणि संध्याकाळी गारवा असे विचित्र वातावरण राहिल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले. या पावसामुळे नागरिकांना सायंकाळी सुखद गारवा मिळाला. या पावसामुळे शहर व आसपासच्या परिसरात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)