Kolhapur: मुश्रीफांनाच मतदान, मात्र समरजित यांचाही अनादर नको; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा विचित्र आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:57 PM2024-09-20T12:57:41+5:302024-09-20T13:00:03+5:30
विकासवाडीजवळ भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
कागल : आपले सरकार नसले तर काय होते हे आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनुभवले आहे. त्यामुळे आपली सत्ता येणे महत्त्वाचे आहे. आपणाला एखादा निर्णय आवडला नाही तरी महायुती म्हणून मतदान करायचे आहे. कागलमधूनहसन मुश्रीफ यांना महायुतीची उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांना आपल्याला निवडून आणायचे आहे, असे स्पष्ट आदेश उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांना दिले.
येथील विकासवाडीजवळ आयोजित कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्याला जोडूनच ते असेही म्हणाले की, समरजित घाटगे आपले आहेत. एखादा मुलगा चुकला तर त्याला आपण शिक्षा देत नाही. मतदान महायुतीलाच करायचे, पण त्यांच्यावर कोणी काही बोलायचे नाही. ते आपले जिल्हाध्यक्ष होते. राजर्षी शाहूंचे वंशज आहेत. त्यांचा अनादर होऊ देऊ नका. म्हणून काय गडबडही करू नका, असा विचित्र सल्लाही त्यांनी दिला.
मंत्री पाटील म्हणाले, महायुतीची सत्ता असल्याने पालकमंत्री मुश्रीफ यांनी समरजित घाटगे समोर असतानाही निधी दिला आहे. त्यामुळे पुढे अन्याय होईल, असे कोणी समजू नये. खासदार महाडिक यांनी कागल मतदारसंघात मंत्री मुश्रीफ यांनी भाजपाच्या वाट्याचा तीस टक्के निधी दिला आहे. महाडिक युवा शक्तीचा कोणीही कार्यकर्ता वेगळा विचार करणार नाही.
मेळाव्यास खासदार धनंजय महाडिक, अशोक चराटी, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, चौगुले, भूषण पाटील, परशुराम तावरे, हेमंत कालेकर, रमेश रिंगणे, राजेंद्र तारळे, एकनाथ पाटील, अरुण सोनुले संदीप गिरीबुवा आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रीतम कापसे, चंद्रकांत सावंत, तानाजी कुरणे परशुराम तावरे यांचीही मनोगते झाली.
मुश्रीफ म्हणून नव्हे तर..
या वेळी मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले एकमेकांचा हिशोब चुकता करायचा म्हटले तर सरकार येणार नाही. नेत्यांची इच्छा किंवा आदेश समजून महायुतीसाठी कामाला लागा. ज्यांना युती धर्म पाळायचा नाही त्यांनी गप्प घरी बसावे. निलंबन करण्याची वेळ येऊ देऊ नका. मुश्रीफ म्हणून नव्हे तर महायुती म्हणून काम करा, पण शब्दछल करीत बसू नका. तुम्हाला कोणी धरून ठेवलेले नाही. कोरा कागद व पेन घरी पाठविला जाईल.