विशेष मोहिमांमुळे मतदारांचा टक्का वाढला--‘वारे निवडणुकीचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 07:02 PM2019-01-07T19:02:02+5:302019-01-07T19:04:02+5:30
तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी झालेले प्रयत्न, पहिल्यांदाच वापर होणाºया ‘व्हीव्हीपॅट’ विषयी जनजागृती अशा विविध टप्प्यांवर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचा आढावा घेणारी ‘वारे निवडणुकीचे’ ही मालिका आजपासून...
प्रवीण देसाई ।
तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी झालेले प्रयत्न, पहिल्यांदाच वापर होणाºया ‘व्हीव्हीपॅट’ विषयी जनजागृती अशा विविध टप्प्यांवर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचा आढावा घेणारी ‘वारे निवडणुकीचे’ ही मालिका आजपासून...
कोल्हापूर : जिल्ह्यात निवडणूक विभागाकडून राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीतील आकडेवारी एकूण २९ लाख ६५ हजार ३१४ अशी आहे. यामध्ये सुमारे सव्वा लाख मतदार वाढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर दुबार, मृत झालेले मतदारही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. सैनिकी मतदारांसह गृहनिर्माण संस्थांमधील व महाविद्यालयांतील तसेच दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचीही नोंदणी करण्याचा वेगळा प्रयत्न या निमित्ताने झाला आहे.
दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर या कालावधीत घेण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रांवर विशेष मोहिमा घेण्यात आल्या. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या ठिकाणी थांबून मतदार नोंदणी तसेच नाव दुबार किंवा मृत असेल तर ते कमी करण्याचे काम करीत होते. यामध्ये कुचराई करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. प्रामाणिक हेतूने सुरू असलेल्या या प्रयत्नांना अशा काही कामचुकार लोकांमुळे गालबोट लागण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. परिणामी मोहिमेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयासह, सर्व प्रांताधिकारी कार्यालये व तहसील कार्यालयातील कर्मचारी यात सहभागी झाले होते.
मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ लाख २४ हजार ४३७ मतदार वाढले आहेत, तर ४ हजार २४३ मतदार हे दुबार, बोगस, मृत अशा विविध कारणांमुळे रद्द होणार आहेत. ११ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक १६ हजार ७६२ अर्ज नव्याने मतदार नोंदणीसाठी आले आहेत. याच मतदार संघातील १२ हजार मतदार तीन महिन्यांपूर्वी झालेल्या तपासणीत रद्द झाले आहेत.
गृहनिर्माण संस्था, शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, आदी ठिकाणी जाऊन स्थानिक रहिवासी व युवक विद्यार्थ्यांशी संवाद साधून मतदार नोंदणीचे आवाहन केले. परिणामी, चांगल्या प्रकारे मतदार नोंदणी झाली. सीमेवर लढणाºया जवानांचीही नोंदणी करून सर्वच घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. दिव्यांग नोंदणीसाठीही विशेष प्रयत्न सुरू आहेत. ३ डिसेंबरला अपंग दिनानिमित्त ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर करून त्यांना मतदानाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले. निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रबोधनाचा जागर केला.
गृहनिर्माण संस्थांमधील
मतदार अर्ज
गृहनिर्माण संस्था- ४६७
अर्जांची- ६२५०
महाविद्यालयातील मतदार अर्ज
महाविद्यालयांची संख्या- १०९
१८ ते १९ वयोगटातील अर्जसंख्या- ८२५६
निवडणुकीसाठी मनुष्यबळ
वर्ग- १ (झोनल आॅफिसर) : १०९७
वर्ग- २ (केंद्रप्रमुख) : ११७६
वर्ग- ३ (मतदान केंद्रावरील कर्मचारी) : २१६४२
वर्ग - ४ (शिपाई) : ६२६२