नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू
By admin | Published: July 13, 2016 12:24 AM2016-07-13T00:24:57+5:302016-07-13T00:42:43+5:30
अमित सैनी : प्रभागनिहाय, महाविद्यालयांमध्ये अर्ज स्वीकृती केंद्रे; ३१ आॅगस्टपर्यंत मुदत
कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणी अभियान व प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासाठी नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा प्रशासनाधिकारी नितीन देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, वडगाव, गडहिंग्लज, कुरुंदवाड, मुरगूड, मलकापूर, पन्हाळा या नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. १० सप्टेंबर २०१६ ची मतदार यादी ग्राह्ण धरण्याची सूचना केली आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेची दि. १ जानेवारीची मतदार यादी आणि १० सप्टेंबरपर्यंत नावे नोंद असलेली पुरवणी यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी, नावांमध्ये दुरुस्ती, नाव वगळणे, आदी स्वरूपांतील प्रक्रियांचा प्रारंभ झाला आहे. यासाठी प्रभागनिहाय आणि महाविद्यालय पातळीवर अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू केली आहेत. देसाई म्हणाले, महाविद्यालयांच्या पातळीवर पहिल्यांदाच केंद्रे सुरू केली आहेत. नगर परिषदेच्या हद्दीत सर्वसाधारण वास्तव्यास असणाऱ्या व १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. त्याची माहिती अर्ज स्वीकृती केंद्रांवर देण्यात येईल. कुरुंदवाड व पन्हाळ्यामधील महाविद्यालयातील केंद्रे लवकरच जाहीर केली जातील. मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्ती व नाव वगळण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्टपर्यंत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील महाविद्यालयीन केंद्रे
इचलकरंजी : डी. के. एस.सी. कॉलेज, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयवंत महाविद्यालय. जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, घोडावत कन्या महाविद्यालय. कागल : डी. आर. माने महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय. वडगाव : बळवंतराव यादव ज्युनिअर कॉलेज, वडगाव विद्यालय, अशोकराव माने आयजीआयटी (फार्मसी), इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय. गडहिंग्लज : शिवराज कॉलेज, ओंकार कॉलेज, साधना कॉलेज, एस. एन. कॉलेज, गडहिंग्लज हायस्कूल, डॉ. घाळी महाविद्यालय. मुरगूड : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय. मलकापूर : प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज.