कोल्हापुरात मतदार दिन, नवमतदार, सहस्त्रक मतदार, दिव्यांग मतदारांना ओळखपत्र , मतदार जनजागृती प्रभातफेरीने शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:21 PM2018-01-25T17:21:20+5:302018-01-25T17:33:54+5:30
कोल्हापुरात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना गुरुवारी १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या सहस्त्रक मतदारांना आणि दिव्यांग मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच मतदान जागृतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि प्रगल्भतेसाठी प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे केले.
कोल्हापूर : कोल्हापुरात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना गुरुवारी १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या सहस्त्रक मतदारांना आणि दिव्यांग मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच मतदान जागृतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि प्रगल्भतेसाठी प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे केले. मतदार दिन हा देशात लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कुणाल खेमनार, डॉ. अभिजित चौधरी, संयोगीता पाटील, नसिमा हुरजूक आदी उपस्थित होते.
शाहू स्मारक भवन येथे जिल्हा निवडणूक विभागातर्फे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, हेल्पर्स अॅन्ड हँडिक्राफ्ट संस्थेच्या अध्यक्षा नसिमा हुरजूक, प्रसिद्ध नृत्यांगना संयोगीता पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, लोकशाही अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी मतदानाचा मूलभूत हक्क नागरिकांनी बजावायलाच हवा. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनीही मतदान नोंदणी करून आपण भारताचे मतदार असल्याचा अभिमान बाळगावा. लोकशाहीच्या संपन्नतेसाठी प्रत्येकाने सद्सदविवेकबुद्धीने आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. डॉ. अभिजित चौधरी म्हणाले,लोकशाही प्रक्रिया बलशाली करण्यासाठी मतदार जागृती महत्त्वाची असून युवक-युवतींनी याकामी बहुमोल योगदान द्यावे.
नसिमा हुरजूक म्हणाल्या, मतदान प्रक्रियेत दिव्यांगांचेही १०० टक्के मतदान कसे होईल, याबाबत प्रयत्न व्हावेत, यासाठी दिव्यांगाचे मतदान नोंदणीबरोबरच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. निवासी उपल्हिाधिकारी शिंदे यांनी स्वागत केले.
करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे, निवडणूक तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, नेहरू युवा केंद्रातर्फे मतदारजागृतीविषयक प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली.
मतदार जनजागृती प्रभातफेरीने शहर दुमदुमले
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त १८ वर्षांवरील मतदारांमध्ये मतदानाच्या जागृतीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींची प्रभातफेरी बिंदू चौक- शिवाजी पुतळा - महानगरपालिका-दसरा चौक या मार्गावरून परत शाहू स्मारक भवन येथे आली. ‘एक मत, एक मूल्य’, ‘एकच लक्ष्य, मताचा हक्क’, ‘मतदार असल्याचा अभिमान बाळगा’ अशा विविध घोषणांनी मतदार जनजागृतीपर रॅलीने कोल्हापूर शहर दुमदुमले.