LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

By पोपट केशव पवार | Published: May 7, 2024 12:32 PM2024-05-07T12:32:52+5:302024-05-07T12:36:37+5:30

सेल्फी पॉईंटवर मतदारांची गर्दी

Voters of South Vidhan Sabha Constituency of Kolhapur Lok Sabha Constituency flock to vote | LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

कोल्हापूर : एकीकडे उन्हाच्या चटक्याने राज्यभरात मतदानाची टक्केवारी घटत असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मात्र, भर उन्हातही रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र मंगळवारी गावागावात पाहायला मिळत आहे. शहरात ३३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज मंगळवारी मतदान सुरु आहे.  मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावागावांमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर रांगा लावून नागरिक मतदान करत आहेत. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूल केंद्रावर सकाळी सातपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. उन्हाच्या आधी मतदान करुन जाण्यासाठी या केंद्रावर अकरा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी झाली. मतदारांना उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. साळोखेनगर येथील शिवशक्ती विद्यालयातील मतदान केंद्रावरही मोठी गर्दी दिसून आली. 

विशेष म्हणजे दुपारी १२ वाजेपर्यंत या केंद्रावरील गर्दी कमी झाली नाही. पाचगावमध्ये तिन्ही केंद्रे मतदारांच्या गर्दीने फुलून गेली. येथील पाचगाव विद्यामंदिर केंद्रावर दिव्यांग मतदारांचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आर.के.नगरमध्येही मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. उजळाईवाडी येथील विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावरही प्रचंड गर्दी होती.

सेल्फी पॉईंटवर मतदारांची गर्दी

प्रशासनाच्यावतीने सेल्फी पॉईंट करण्यात आला असून मतदान झाल्यानंतर मतदार सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या केंद्रावर मतदारांना मंडपासहित बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गांधीनगर येथे तीन मतदान केंद्र असून या सर्वच केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली होती. सरनोबतवाडी येथे एकच मतदान केंद्र असले तरी सकाळी सातपासूनच सरनोबतवाडीकरांनी चुरशीने मतदान केले.

Web Title: Voters of South Vidhan Sabha Constituency of Kolhapur Lok Sabha Constituency flock to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.