आजरा अर्बन बँकेसाठी २४ जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:28+5:302020-12-17T04:47:28+5:30
आजरा : येथील आजरा अर्बन बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम गुरुवार, १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मुख्य कार्यालयासह ३२ शाखा ...
आजरा : येथील आजरा अर्बन बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम गुरुवार, १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मुख्य कार्यालयासह ३२ शाखा असणाऱ्या बँकेचे ३३ हजार सभासद आहेत. बँकेसाठी २४ जानेवारीला, तर मतमोजणी २७ जानेवारीला होणार आहे. पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्ह्यासह निबंधक अरुण काकडे काम पाहत आहेत.
आजरा बँक मल्टी-स्टेट असल्याने बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत शाखा आहेत. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, गुरुवारी (दि. १७) निवडणूक कार्यक्रम व कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
२१ डिसेंबरपर्यंत यावर हरकती, २२ डिसेंबर रोजी हरकतीवर सुनावणी, २४ डिसेंबर रोजी पक्की मतदार यादी प्रसिद्ध करणे, २८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर करणे, ४ जानेवारी रोजी आलेल्या अर्जांची छानणी, पात्र उमेदवारांची नावे ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत. अर्जांची माघार ६ ते ११ जानेवारी असून, १२ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १३ जानेवारी रोजी बँक मल्टी-स्टेट असल्याने सर्वसाधारण सभा आजरा हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. गरज भासलेस २४ जानेवारी रोजी मतदान सकाळी ८ ते ५ या वेळेत तर मतमोजणी २७ जानेवारी रोजी होणार आहे.
संचालक मंडळाची रचना बँक मल्टी-स्टेट झाल्यामुळे बदलली आहे. त्यानुसार सर्वसाधारण १२, कोल्हापूर जिल्ह्यातील शाखा प्रतिनिधी १, उर्वरित महाराष्ट्र शाखा प्रतिनिधी १, महाराष्ट्र राज्याबाहेरील शाखा प्रतिनिधी १, महिला २, अनुसूचित जाती-जमाती गट १ असे १८ संचालक असणार आहेत.