ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

By Admin | Published: March 25, 2015 12:19 AM2015-03-25T00:19:37+5:302015-03-25T00:42:03+5:30

आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; ४२ ठिकाणी पोटनिवडणुका

Voting on April 22 for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

googlenewsNext

कोल्हापूर : ‘ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. या सर्व ग्रामपंचायतींसह ४२ ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे तेथे मंगळवारी रात्रीपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिलअखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ८ एप्रिलला छाननी होणार आहे. १० एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेतले जाणार आहे तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी तेथील तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रत्येक तालुकानिहाय पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसातील तालुक्यासाठी ही नियुक्ती आहे. प्रशांत पाटील (करवीर), रवींद्र खाडे (पन्हाळा), मोनिकासिंग (राधानगरी) कीर्ती नलवडे (भुदरगड), कुणाल खेमनार (गडहिंग्लज), अश्विनी जिरंगे (हातकणंगले), विद्युत वरखेडकर (शाहूवाडी), संगीता चौगुले (कागल), स्वाती देशमुख (गगनबाबडा), विवेक आगवणे (चंदगड), शैलेश सूर्यवंशी (आजरा), संजय पवार (शिरोळ) यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार
ग्रामपंचायतीची निवडणूक घराघरांपर्यंत पोहोचलेली असते. निवडणुकीमुळे प्रत्येक गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. या निवडणुका गावातीलच गटांतर्गत लढविण्यात येतात. त्यामुळे गावा-गावांतील राजकीय इर्ष्या, गटबाजी शिगेला पोहोचलेली पाहायला मिळणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा
मतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा - करवीर ५४, कागल ५३, पन्हाळा ४१, शाहूवाडी ३७, शिरोळ ३४, हातकणंगले २०, राधानगरी २०, भुदरगड ४२, गगनबावडा ८, आजरा २६, चंदगड ३९, गडहिंग्लज ४८.

Web Title: Voting on April 22 for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.