‘गोकुळ’साठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:24 AM2021-05-01T04:24:22+5:302021-05-01T04:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उद्या, रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उद्या, रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून, ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सामना होत आहे. नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागल्याने निवडणुकीत साम, दाम, दंड अशा सर्व नीतीचा वापर करण्यात आला.
राज्यातील सर्वात सक्षम असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीची गेले दोन महिने रणधुमाळी सुरू आहे. संघावर गेली अनेक वर्षे पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. गेली पाच वर्षे दूध दरवाढ, पशुखाद्याच्या दरातील वाढ, मल्टीस्टेट आदी मुद्द्यांवरून मंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटाची कोंडी केली होती. त्यांच्या रेट्यामुळेच मल्टीस्टेटचा निर्णय मागे घ्यावा लागला होता.
हाच मुद्दा सध्या प्रचारात असून, टँकर वाहतूक आदी मुद्द्यांवर विरोधकांनी रान उठवले आहे. चारशे कोटींच्या ठेवी असणारा ‘गोकुळ’ हा राज्यातील एकमेव दूध संघ असल्याचा दावा सत्तारूढ गट करत आहे. त्याचबरोबर ३, १३, २३ तारखेला न चुकता शेतकऱ्यांना पैसे देण्याची परंपरा जोपासल्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात रेटला आहे.
‘गोकुळ’च्या कारभारावर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी त्यापेक्षाही मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील जुगलबंदीने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, साहाय्यक म्हणून तहसीलदार शरद पाटील व साहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख हे काम पाहत आहेत.
३६४७ मतदान होणार
‘गोकुळ’साठी ३६५० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर गेल्या महिन्याभरात तीन मतदारांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आता ३६४७ मतदार हक्क बजावणार आहेत.