पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:12 PM2020-11-30T19:12:56+5:302020-11-30T19:14:20+5:30
Vidhan Parishad Election, pune, collcatoroffice, kolhapurnews पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळीच साडेतीन हजार कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन केंद्रांवर पोहोचले असून, मतदानासाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे.
कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळीच साडेतीन हजार कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन केंद्रांवर पोहोचले असून, मतदानासाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून ६३, तर शिक्षक मतदारसंघातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यावेळेला पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत असल्याने चुरस पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीकडून पदवीधरमधून अरुण लाड, तर शिक्षकमधून प्रा. जयंत आसगावकर हे रिंगणात आहेत.
भाजपकडून अनुक्रमे संग्राम देशमुख व जितेंद्र पवार (पुरस्कृत) यांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. यापुर्वी ही निवडणूक कधी झाली, हे सामान्य माणसाला कळायचेही नाही; मात्र यावेळेला लोकसभा व विधानसभा निवडणूकीप्रमाणे प्रचार सभा पाहावयास मिळाल्या.
राज्यात अनपेक्षितपणे आकारास आलेल्या महाविकास आघाडीची पहिली निवडणूक असल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे, तर पुणे पदवीधरचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न आहेत.
अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधरसाठी २०५, तर शिक्षकसाठी ७६ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. उद्या, सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून, गुरुवारी सकाळी आठपासून पुणे येथे मतमोजणी होणार आहे.
एका केंद्रावर १२ कर्मचारी
एका मतदान केंद्रावर १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, अशा ३५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एका केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी (४०० पेक्षा जास्त मतदान असेल तर ४), १ शिपाई, २ आरोग्य कर्मचारी, २ कर्मचारी सोशल डिस्टन्सिंगसाठी, १ अंगणवाडी कर्मचारी, १ पोलीस किंवा होमगार्ड.