वृक्ष प्रसाद योजना राज्यभर मॉडेल ठरेल, अभिनेते मनोज वाजपेयींनी कौतुक केले
By संदीप आडनाईक | Published: December 3, 2022 03:44 PM2022-12-03T15:44:00+5:302022-12-03T15:46:41+5:30
ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातून सुरू केलेली वृक्ष प्रसाद योजना यापुढे राज्यभर महाराष्ट्र मॉडेल म्हणून ओळखली जाईल, अशा शब्दात या उपक्रमाचे अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कौतुक केले. ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे अंबाबाई मंदिरात सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी यांच्या हस्ते वृक्ष प्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. दोघांनीही प्रारंभी देवी अंबाबाईला अभिषेक केला. दोघांच्या हस्ते भाविकांना म्हाळुंग, पारिजातक, बेल, जास्वंदी, अर्जुन या प्रजातीमधील फळांची आणि फुलांची रोपे देण्यात आली.
यांनतर प्रेस क्लब येथील वार्तालाप कार्यक्रमात सयाजी शिंदे आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. हा वृक्षप्रसाद पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार आहे. प्रसाद म्हणून आपण नारळ, लाडू किंवा पेढा याऐवजी झाडच प्रसाद म्हणून मिळाल्यास त्याचा घरोघरी फायदा होणार आहे. या योजनेचे देशभर त्याचे धडे गिरवले जातील अशी अपेक्षा वाजपेयी यांनी व्यक्त केली.
सयाजी म्हणाले, हा एक विचार आहे, तो कोल्हापुरातूनच सुरू झाला आहे. ज्यांची देव आणि आई-वडिलांवर श्रद्धा आहे, त्यांनी हा प्रसाद द्यायचा आहे. झाड कधी तुम्हाला फसवत नाही, त्यामुळे हा प्रसाद म्हणून नेलेले झाड पुढच्या अनेक पिढ्या तुम्हाला फळे देत राहणार आहे. मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स यांनी या योजनेला सहकार्य केले. यावेळी वन्य जीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, सह्याद्रीचे कोल्हापूर प्रमुख शैलेश बांदेकर, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, धनाजी जाधव, सुहास भयंकर, बबलू मोकळे, जितेश गिरी उपस्थित होते.
वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोड
या वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोड असून याची माहिती ऑनलाईन समजू शकणार आहे. भाविकांना मिळालेले झाड त्यांनी कुठे लावले आणि त्यांची संगोपन केले याचे सेल्फीही पाठवण्याचे आवाहन सयाजी यांनी केले आहे.