व्हीव्हीपॅटमुळे निकाल लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:29 AM2019-05-17T11:29:50+5:302019-05-17T11:38:57+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार असल्याने अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. निकाल लांबणार असल्याचे लक्षात येत असल्याने निवडणूक विभाग दक्ष झाला असून, त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन निकाल वेळेत कसे पूर्ण होतील, याच्या टिप्स देण्यास सुरुवात केली आहे.

VVPat likely to delay the result | व्हीव्हीपॅटमुळे निकाल लांबण्याची शक्यता

 कोल्हापूर येथे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पार पडावी, या हेतूने निवडणूक विभागाने निवडणूक कर्मचाऱ्यांना विशेष शिबिरात प्रशिक्षण दिले. कोल्हापूर मतदारसंघासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी मार्गदर्शन केले. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देमतमोजणी वेळेत होण्यासाठी निवडणूक विभाग दक्षएक हजार कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार असल्याने अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. निकाल लांबणार असल्याचे लक्षात येत असल्याने निवडणूक विभाग दक्ष झाला असून, त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन निकाल वेळेत कसे पूर्ण होतील, याच्या टिप्स देण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक हजार निवडणूक कर्मचाऱ्यांना निकाल प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. कोल्हापूर मतदारसंघासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी व विजया पांगारकर यांनी; तर हातकणंगले मतदारसंघासाठी राजाराम महाविद्यालयातील सभागृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले व अमित माळी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना पॉवरपॉइंटद्वारे प्रशिक्षण दिले.


कोल्हापूर येथे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पार पडावी, या हेतूने केशवराव भोसले नाट्यगृहात निवडणूक विभागाने आयोजित केलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)

मतमोजणीला वेळ कमी लागावा म्हणून एकापाठोपाठ मोजणी करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे; पण अजून त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सध्याच्या नियोजनानुसार संपूर्ण मतमोजणीनंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. साहजिकच याला वेळ लागणार आहे.

क्रॉस व्होटिंगच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर असल्याचे गृहीत धरून कर्मचाऱ्यांना सांगितल्याप्रमाणेच मोजणी प्रक्रिया सुरू ठेवावी. मोठ्या तक्रारी असल्यास संबंधित निवडणूक निरीक्षकांसह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, अशा सूचनाही केल्या गेल्या.

व्हीव्हीपॅटसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था

ईव्हीएमबरोबरच या वर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांचीही रॅँडम पद्धतीने तपासणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच याप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ३०, तर हातकणंगले मतदारसंघातील ३० अशा ६० केंद्रांवरील मतांची फेरमोजणी होणार आहे. यासाठी नियमित मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय २० टेबल लावण्यात आले आहेत. त्यात व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबलांची सोय आहे. त्यासाठी एक निरीक्षक व दोन सहायक नियुक्त करण्यात येणार आहेत.

चिठ्ठ्या टाकून निवड होणार

संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर या स्वतंत्र टेबलावर ठेवण्यात आलेल्या पारदर्शक डब्यामध्ये सर्व मतदारसंघांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. मतदारसंघनिहाय प्रत्येकी पाच चिठ्ठ्या काढून त्या निवडणूक निरीक्षक, राजकीय पक्षनिरीक्षक यांच्यासमोर मोजल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी-शर्तीस अधीन राहूनच मतदारसंघातील केंद्राची निवड होणार आहे.

मतामध्ये तफावत आढळल्यास फेरमोजणीसह कारवाई

ईव्हीएममधील मते मोजून झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतांशी त्यांची पडताळणी केली जाणार आहे. व्हीव्हीपॅटमधील मते अंतिम मानली जाणार आहेत. या दोन्ही मशीनमधील मतांमध्ये एका जरी मताचा फरक पडला तरी संपूर्ण २० टेबलांवरील मतमोजणी नव्याने केली जाणार आहे. शिवाय हा बेजबाबदारपणा समजून मोजणी करणारे निरीक्षक व सहायक यांच्यावर कारवाई होणार आहे.

उद्या पुन्हा प्रशिक्षण

व्हीव्हीपॅटमुळे मतमोजणी प्रक्रिया क्लिष्ट झाली असल्याने ती अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी गुरुवारी प्रशिक्षण झाल्यानंतर आता उद्या, शनिवारी पुन्हा एकदा लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.


 

 

Web Title: VVPat likely to delay the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.