‘लोकमत’ आयोजित ‘वाचाल तर जिंकाल’ योजना
By admin | Published: January 26, 2015 12:18 AM2015-01-26T00:18:45+5:302015-01-26T00:22:23+5:30
राजर्षी शाहूंचे चरित्र चित्रकथा रूपात : २८ जानेवारीपासून प्रसिद्ध ; विजेत्यांना आकर्षक बक्षिसांची भेट
कोल्हापूर : नव्या पिढीसह सर्व समाजाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रकथा २८ जानेवारीपासून प्रसिद्ध होणार आहे. शाहू महाराजांवर आजवर मालिका झाल्या, अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र, त्यांचे चरित्र दैनिकात चित्रकथा रूपात प्रसिद्ध होण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. ‘वाचाल तर जिंकाल’ या स्पर्धात्मक योजनेत या चित्रकथांवर आधारित उत्तरे देणाऱ्या भाग्यवान वाचकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी आर. बी. मालू ग्रुपचे सहकार्य लाभले आहे.
लहान मुलांना पुस्तक वाचनाची आवड असतेच असे नाही. असली तरी त्यात सातत्य राहत नाही. शाहू महाराजांचे चरित्र आजवर अनेक ग्रंथांतून मांडले गेले आहे; पण ही पुस्तके मुख्यत्व वयाचा एक टप्पा पार केलेल्या व्यक्तींकडून वाचली जातात; पण शाहू महाराजांच्या विचारांचे संस्कार बालमनावर होणे गरजेचे आहे. त्यासाठीचे अभिनव पाऊल म्हणून ‘लोकमत’मध्ये ‘वाचाल तर जिंकाल’ या योजनेंतर्गत ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रकथा २८ जानेवारी ते २७ एप्रिलपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत. शाहू यांच्या जीवनावर आधारित प्रमुख घटना, प्रसंगांची माहिती होईल, या कथांवर आधारित दररोज एक प्रश्न विचारला जाणार आहे व त्या प्रश्नाचे अचूक उत्तर वाचकांनी द्यावयाचे आहे. अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांना स्पर्धा संपल्यानंतर आकर्षक बक्षिसे सोडत पद्धतीने काढण्यात येतील.
अशी मिळणार बक्षिसे
बंपर बक्षीस म्हणून एका विजेत्याला अल्टो कार मिळणार आहे. पहिले बक्षीस म्हणून तीन विजेत्यांना एक तोळे सोन्याचा नेकलेस, द्वितीय पाच विजेत्यांना एलईडी/एलसीडी टीव्ही, तिसऱ्या क्रमांकाच्या पाच विजेत्यांना गॅस शेगडी व चौथ्या क्रमांकाच्या दहा विजेत्यांना मोबाईल हॅँडसेट बक्षिसे म्हणून दिले जातील. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून १५१ जणांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी आजच आपल्या अंकविक्रेत्याकडे अंकाचे बुकिंग करावे, असे आवाहन ‘लोकमत’ व आर. बी. मालू ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
लहान मुलांवर झालेले संस्कार कायमस्वरूपी राहतात. मुले पुस्तके वाचतीलच असे नाही; पण चित्रे नेहमीच मन आकर्षून घेत असतात. राजर्षी शाहू महाराजांवर आधारित या चित्रकथेमुळे मुलांना शाहू महाराज व त्यांचे कार्य समजेल. शाहू महाराजांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.
- इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक )