व्यासंगी मुख्याध्यापक : आबासाहेब चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:52+5:302021-08-12T04:27:52+5:30
शशिकांत जाधव (शाळेच्या १९५६ च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी) दिवंगत ईश्वराप्पांना नडगदल्ली यांनी नूलमधील स्वातंत्र्यसैनिक ...
शशिकांत जाधव
(शाळेच्या १९५६ च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी)
दिवंगत ईश्वराप्पांना नडगदल्ली यांनी नूलमधील स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने जून १९५६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करून गडहिंग्लजच्या पूर्व भागातील वीसहून अधिक खेड्यातील मुलांची माध्यमिक शिक्षणाची सोय केली. या शाळेचे आबासाहेब चौगुले हे पहिले शिक्षक व मुख्याध्यापक होत. चौगुले सरांनी या शाळेतील आपल्या १९५६ ते १९९३ या प्रदीर्घ सेवा काळात खडतर परिश्रम करून दूरस्थ ग्रामीण भागातील या शाळेचा लौकिक वाढवला. सरांचे इंग्रजी, भूगोल, गणित, संस्कृत व अर्धमागधी या विषयावर प्रभुत्व होते. त्यांचा इंग्रजी विषयाचा व्यासंग मोठा होता. मुलांचे पायाभूत व्याकरण पक्के करण्यावर लेखन कौशल्य वाढवण्यावर भर असे. शेक्सपिअरच्या अनेक नाटकातील संभाषणे व सुनीते त्यांच्या मुखोद्गत होती. त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्यभर इंग्रजीचे नामवंत शिक्षक व प्राध्यापक म्हणून सेवारत होते व आहेत. अनेक विद्यार्थी उच्चविभूषित होऊन देश व परदेशात विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
सरांनी शालेय शिस्त व चारित्र्य संवर्धनावर जोर दिला. व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व, शिष्यवृत्ती परीक्षा, ग्रंथालय, क्रीडा व स्काऊटिंग याकडे विशेष लक्ष दिले. शेकडो वृक्ष लावून शाळेचा विस्तीर्ण परिसर हिरवागार केला. प्रत्येक मुलीस सायकलिंग व पोहता यावे यावर त्यांनी लक्ष दिले. शाळेत १९८२ पासून तंत्र शिक्षणाची सोय करून शेकडो विद्यार्थ्यांचे व्यावसायिक भवितव्य घडवले. शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केलाच पाहिजे. शाळेच्या भव्य क्रीडांगणाचा राज्य व केंद्र शासन अनुदानाने व संस्थेच्या स्वनिधीतून सपाटीकरण व विकास केला. विविध खेळांची सोय केली व केंद्र शासनाच्या ग्रामीण क्रीडा केंद्र, नोडल स्पोर्ट्स स्कूल या योजना राबवल्या. हॉकी या खेळात राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत शाळेच्या मुला-मुलींच्या संघाने प्रावीण्य मिळवून अनेक पारितोषिके व भरघोस रकमेच्या शेकडो शिष्यवृत्त्या मिळवल्या. क्रीडा प्रावीण्य यावर खेळाडूंनी सैन्यदल, पोलीस, वनखाते इत्यादीमध्ये नोकऱ्या पटकावल्या. खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, मलखांब, कुस्ती, बास्केटबॉल, हँडबॉल इत्यादी खेळातही मुला-मुलींनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या जाण्याने नूलच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या चिरस्मरणीय आत्म्यास शांती लाभो.
हॉकी पंढरीसाठी तळमळ..
चौगुले सरांनी नूलमध्ये हॉकीला बळ देण्यासाठी खूप प्रयत्न केले. भारतीय खेळ प्राधिकरणाने या कार्याची दखल घेऊन शाळेत २००९ पासून खेलो इंडिया मिनी हॉकी सेंटर चालवले असून ३० मुला-मुलींच्या प्रशिक्षण, शिष्यवृत्ती व विविध भत्त्यांची सोय केली आहे. राज्यातील हे एकमेव केंद्र असून हॉकी पंढरी म्हणून राज्यभर या शाळेचा लौकिक आहे.
फोटो : १००८२०२१-कोल-आबासाहेब चौगले-लेख