वडणगे, शिये, सांगरूळ, पाचगाव राखीव ?
By admin | Published: October 4, 2016 12:37 AM2016-10-04T00:37:09+5:302016-10-04T01:03:48+5:30
आरक्षणामुळे दिग्गज धास्तावले : कोपार्डे, उचगाव, परिते, सडोली खालसा खुला होण्याची शक्यता--करवीरचेराजकारण
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण सोडतीकडे करवीरकरांच्या नजरा लागल्या असून, गत दोन निवडणुकीतील आरक्षण पाहता वडणगे, शिये, सांगरूळ, पाचगाव यापैकी दोन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होणार आहेत. कोपार्डे, उचगाव हे मतदारसंघ खुले होण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका फेबु्रवारी २०१७ मध्ये होत असून, करवीर तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती मतदारसंघातील आरक्षण सोडत उद्या, बुधवारी आहे. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिये जिल्हा परिषद मतदारसंघ सन २००७ ला सर्वसाधारण महिला तर २०१२ ला सर्वसाधारण राहिला आहे.
वडणगे २००७ व २०१२ सलग दोनवेळा खुला राहिला आहे. सांगरूळ सन १९९२ पासून सन २००७ पर्यंत खुला राहिला आहे, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित राहिला. पाचगाव सन २००७ खुला, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित राहिला.
या चारपैकी दोन मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे. कोपार्डे सन २००७ अनुसूचित जाती, तर सन २०१२ ला इतर मागासवर्गीय राखीव राहिला आहे. उचगाव सलग दोनवेळा इतर मागासवर्गीयसाठी आरक्षित आहे. सडोली खालसा व परिते सन २००७ ला इतर मागासवर्गीय, तर सन २०१२ अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिले.
त्यामुळे हे चारही मतदारसंघ खुले होण्याची शक्यता अधिक आहे. मुडशिंगी, कळंबे तर्फ ठाणे (नवीन दिंडनेर्ली), गोकुळ शिरगाव या मतदारसंघाला लॉटरी लागू शकते. यापैकी एखादा खुलाही होऊन इतर मतदारसंघ राखीवही राहू शकतात.
इच्छुकांना झटका : पुनर्रचनेचीही धास्ती!
यावेळेला मतदारसंघाच्या पुनर्रचनेसह आरक्षण काढले जाणार आहे. पुनर्रचनेत गावे इकडे तिकडे होणार आहेत.
कळंबे, पाचगांव, कोपार्डे, सांगरूळ मतदारसंघांतील गावे इकडे-तिकडे सरकल्याची चर्चा आहे.
त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होणार नाही, पण पंचायत समितीच्या इच्छुकांना झटका बसणार हे
नक्की आहे.