वडगाव बाजार पेठ बंद : अत्यावश्यक सेवा, किराणा, धान्य दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:47+5:302021-04-09T04:26:47+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन सुरू झाले आहे. परंतु बाजारातील गर्दी पाहता, कोरोनाची साखळी खंडीत होईल का? असा प्रश्न आहे. शहरामध्ये पालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने, किराणा, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, भाजी, मटण - मच्छी, मासे विक्रेते, फूल विक्रीचे व्यवसाय सुरू आहेत. याशिवाय हॉटेल्सच्या माध्यमातून पार्सलची (होम डिलिव्हरीची) सेवा सुरू आहे.
आज कार्यालयीन अधीक्षक मारुती कदम, कर निरीक्षक स्वप्नील रानगे, सुरेश भोपळे, हवालदार वारके,
विशाल हुबळे, रजनीकांत वाघमारे यांचा पथकाने बंदचे आवाहन केले. अनेकांनी यास प्रतिसाद दिला. तर काहींनी निम्मी दुकाने उघडून व्यवसाय सुरूच ठेवला.
दरम्यान, शहरातील बहुचर्चित दोन्ही व्यापारी संघटनांनी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना निवेदन दिले. यावेळी व्यापाऱ्यांना सक्ती करू नका, अशी विनंती केली.
शासनाने कायमस्वरूपी लाॅकडाऊन करणे हा पर्याय नसून, पुन्हा लाॅकडाऊन व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. याबाबत गांभीर्याने विचार करावा, बंदचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा आम्ही कडाडून विरोध करू, असा इशारा दिला आहे.
00000 पेठवडगाव : येथील सरसेनापती धनाजीराव जाधव खुल्या नाट्यगृहासमोर व्यापाऱ्यांकडून नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना गाऱ्हाणे मांडताना छाया : संतोष माळवदे