वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे
By admin | Published: April 29, 2017 12:43 AM2017-04-29T00:43:16+5:302017-04-29T00:43:16+5:30
वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे
तीन अधिकारी; ४९ कर्मचारी कामाच्या तणावात : गुन्हेगारी क्रमवारीत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर
आयुब मुल्ला ल्ल खोची
पेठवडगाव पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कित्येक वर्षांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे परिसरातील २२ गावांत होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करताना जिकिरीचे होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील इतर काही ठाण्यांची नेमणुकीची आकडेवारी पाहता वडगाव मात्र अपेक्षित संख्याबळापासून उपेक्षितच राहिले आहे. सध्या प्रशासकीय बदल्यांचा हंगाम सुरू आहे. त्याचा विचार करता किमान अजून जादा पाच पोलिस अधिकारी व वीस कर्मचारी देणे गरजेचे आहे. त्यामुळे जलदगतीने गुन्हे तपासणी होईल.
वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावीस गावे आहेत. नऊ किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग आहे. इचलकरंजी, सांगली, तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा मार्ग आहे. गेल्या चार वर्षांपासून हा परिसर संवेदनशील बनला आहे. वार्षिक गुन्हे सुमारे २०० प्रलंबित आहेत. अश सर्व परिस्थिती व पार्श्वभूमीचा विचार करता सध्याच्या संख्याबळाला प्रचंड कामाचा ताण आहे, ही वस्तुस्थिती आहे.
सध्या एक पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यासह ४९ पोलिस कर्मचारी आहेत.
विद्यमान पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह यापूर्वीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी चिन्मय पंडित (आयपीएस) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी केलेली आहे.
१ या ठाण्याला ४५ पोलिस कर्मचारी कित्येक वर्षापासून मंजूर आहेत. त्यानंतर लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी याचा वाढलेला आलेख लक्षातच घेतला गेलेला नाही, असेच म्हणावे लागेल. साडेतीन दशके जुनीच मंजुरी पाहिली जाते. त्यामध्ये बदल गरजेचा आहे.
२ यासाठी गेल्या तीन वर्षांत सतत मागणी करण्यात आली; पण अद्यापही यश आलेले नाही. तरीसुद्धा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नियोजनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करीत गुन्हेगारीवर वचक बसविणे यासह पेंडींग गुन्ह्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य दिले आहे.
३ अपुऱ्या संख्याबळामुळे अनेक अडचणींची संख्या वाढतच आहे. यासाठी संख्याबळ वाढवून देणे गरजेचे आहे. सध्या तीन अधिकारी व ४९ पोलिस कर्मचारी आहेत. यामध्ये अजून पाच अधिकारी व वीस पोलिस कर्मचारी वाढवून मिळणे गरजेचे आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरच वाढत चाललेला ताण कमी होईल.