वडगाव पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत दोन लाखांची चोरी आणली उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:25 AM2021-03-05T04:25:14+5:302021-03-05T04:25:14+5:30
पेठवडगाव : तांबवे वसाहत येथे घरातील मुलानेच दोन लाख रुपयांचे दागिने ...
पेठवडगाव : तांबवे वसाहत येथे घरातील मुलानेच दोन लाख रुपयांचे दागिने लंपास गेले होते.... आणि पोलिसांनी ३६ तासांत चोरी उघडकीस आणून मुलाला बेड्या ठोकल्या. ही चोरीची घटना सोमवारी (दि.१) झाली होती.
याबाबत मच्छिंद्रनाथ श्रीपती पाटील (३४, रा. तांबवे वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत फिर्याद श्रीपती राऊ पाटील यांनी वडगाव पोलिसात दिली होती.
तांबवे वसाहत येथे हनुमान मंदिराजवळ
श्रीपती पाटील अन्य मुले, नातेवाईक यांच्यासमवेत राहतात, तर त्यांचा मुलगा
मच्छिंद्रनाथ हा शेजारी राहतो. दरम्यान, सोमवारी श्रीपती पाटील यांच्या घरातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या घटनेनंतर पोलीस चक्रावले गेले होते.
दरम्यान, तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष गोळवे यांनी पोलीस हवालदार अमरसिंह पावरा, दादा माने, संदीप गायकवाड, योगेश राक्षे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी चोरीचे सोने विक्रीला जातील, हे गृहीत धरून सराफ लाइन येथे तपास करीत होते. यावेळी एका सराफा व्यावसायिकाकडे एक जण सोने विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी मच्छिंद्रनाथ श्रीपती पाटील यांची चौकशी केली. सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून लक्ष्मीहार, गंठण, वेल जोड, टाॅप्स, अंगठी असा पाच तोळ्यांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. गायकवाड यांच्यासमोर उभे केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. तपास हवालदार अमरसिंह पावरा करीत आहेत.