वाघजाईप्रश्नी महसूलने ऐकल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:28+5:302021-09-08T04:30:28+5:30

कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या १९०० एकर वाघजाई डोंगरावरील जमीन सपाटीकरण व खरेदी विक्रीसंदर्भात लोकमतने ...

Waghjai Prashni Revenue heard complaints from farmers | वाघजाईप्रश्नी महसूलने ऐकल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी

वाघजाईप्रश्नी महसूलने ऐकल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी

Next

कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या १९०० एकर वाघजाई डोंगरावरील जमीन सपाटीकरण व खरेदी विक्रीसंदर्भात लोकमतने वृत्तमालिका प्रसिद्ध करून याविरोधात आवाज उठविल्यानंतर महसूल प्रशासनाला जाग आली. सांगरूळचे मंडल अधिकारी सुहास घोदे यांनी मंगळवारी भामटे (ता. करवीर) येथे १२ गावांतील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या. तक्रादार शेतकऱ्यांकडून याबाबत दस्तऐवज व लेखी निवेदन घेण्यासाठी सांगरूळचे मंडल अधिकार सुहास घोदे यांना महसूल प्रशासनाने आदेश दिले होते. त्यानुसार घोदे यांनी करवीर व पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना भामटे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून त्यांच्याकडून लेखी म्हणणे घेतले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी १९९२ ला जमीन वाटपाचे रद्द केल्याचा आदेश, दस्त, मूळ मालक म्हणून असणारे सातबारे, १२ गावच्या ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या प्रति सादर केल्या आहेत. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून या जमिनी मूळ मालकाला द्या, अशी मागणी वाघजाई डोंगर बचाव समितीचे अध्यक्ष भगवान पाटील (म्हाळुंगेकर), रंगराव नाईक( मरळी), आर. एन. पाटील, महिपती पाटील (भामटे) व शेतकऱ्यांनी मंडल अधिकारी घोदे यांच्याकडे केली.

कोट :

वाघजाई डोंगर भौगोलिक दृष्टीने पन्हाळा तालुक्यात आहे. तरीही तक्रारीचे स्वरूप पाहून शेतकऱ्यांचे म्हणणे घेण्यास वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. या जमिनीत मूळ मालक, त्यानंतर प्रकल्पग्रस्त व माजी सैनिक यांंनी ती कोणाला विकली याची रीतसर चौकशी होईल.

सुहास घोदे, मंडल अधिकारी

कोट : मंडल अधिकाऱ्यांना सर्व प्रकारच्या तक्रारी, दस्त, मूळ मालकीचे कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांचे जमीन वाटप रद्दचा आदेश, १२ गावचे ठराव दिले आहेत. यातून चौकशी होऊन लॅण्ड माफियांच्या विरोधात कारवाई होईल, अशी आशा आहे.

भगवान पाटील, वाघजाई डोंगर बचाव समितीचे अध्यक्ष

फोटो : ०७ वाघजाई निवेदन

वाघजाई डोंगर सपाटीकरण व खरेदी-विक्रीसंदर्भात नि:पक्ष चौकशी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी सांगरूळचे मंडल अधिकारी सुहास घोदे यांच्याकडे केली.

Web Title: Waghjai Prashni Revenue heard complaints from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.