गौरी लंकेश हत्याप्रकरणी वाघमारेची केवळ दोन तासच होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:18 PM2018-06-18T13:18:21+5:302018-06-18T13:30:47+5:30
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही कर्नाटक ‘एसआयटी’ पथकाने फेटाळली आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही कर्नाटक ‘एसआयटी’ पथकाने फेटाळली आहे.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येचा ‘किलर’ असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे बंगलोर ‘एसआयटी’च्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित वाघमारेकडे चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राच्या ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले, परंतु या पथकाला हात हलवत परत यावे लागणार आहे, कारण कर्नाटकच्या पथकाने वाघमारेला महाराष्ट्राच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे.
गौरी लंकेश यांच्यासह प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि कॉ. पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर केल्याची कबुली संशयित वाघमारे याने दिल्याने महाराष्ट्र ‘एसआयटी’चे विशेष पथक वाघमारे याच्याकडे चौकशी करण्यासाठी रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले होते.
तीन वर्षांनी पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचा दुवा हाती लागल्याने महाराष्ट्राच्या ‘एसआयटी’ पथकाने वाघमारेचा ताबा कर्नाटकच्या पथकाकडे मागितला आहे, मात्र, कर्नाटक पथकाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय वाघमारेला ताब्यात देता येणार नसल्याचे सांगून महाराष्ट्राची विनंती कर्नाटकने फेटाळली आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या ‘एसआयटी’ पथकाने वाघमारेची चौकशी सुरु केली असून रोज केवळ दोनच तास त्याची चौकशी करण्याचे बंधन घालण्यात आल्याचे समजते. कर्नाटकच्या ‘एसआयटी’ने मात्र गौरी लंकेश हत्येच्या तपासातून पानसरे व कलबुर्गी या दोन्ही हत्यांचा संशयित वाघमारे हा महत्त्वाचा दुवा पुढे आणला आहे. वाघमारेच्या आतापर्यंतच्या चौकशीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्या करणारा एकाच विचाराचा गट आहे, असे निष्पन्न झाले आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी ‘मुन्ना’ नामक व्यक्तीने दिल्याची कबुली संशयित वाघमारे याने दिली आहे. त्याला प्रवृत्त करणाऱ्या या ‘मुन्ना?’ची माहिती कर्नाटकचे एसआयटी पथक केवळ दोन तासातच कसे शोधून काढणार हा प्रश्नच आहे.
महाराष्ट्राचे एसआयटी पथक पानसरे हत्येचा गेली तीन वर्षे तपास करीत आहे. त्यांच्या हाती संशयित गायकवाड व तावडे लागले. वाघमारे हा आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठेच आला नाही. असे समजते की सनातन संस्थेचा फरार साधक विनय पवारसोबत परशुराम वाघमारेही कोल्हापूरात येउन गेला होता, मात्र याबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही.