वाघमारेचे मोबाइल सीडीआर मागविले,पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:51 AM2018-06-19T05:51:49+5:302018-06-19T05:51:49+5:30
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते.
कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी वाघमारे याच्याकडून काही पुरावे मिळतात का, याचा शोध पथक घेत आहे. वाघमारेचे पाच वर्षांतील मोबाईल सीडीआर मागविले आहेत. शिवाय, विरेंद्र तावडे, समीर गायकवाड, फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर यांच्याशी काही कनेक्शन आहे काय, याचा शोध पथक घेत असल्याचे महाराष्ट एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
संशयित वाघमारे याच्या चौकशीमध्ये कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाचे पुरावे पुढे आल्याच्या वृत्ताने महाराष्टÑात खळबळ उडाली. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाड व विरेंद्र तावडे या दोघांना अटक झाली आहे. या दोघांनाही जामीन मिळाला आहे. तर या हत्येतील संशयित पवार व अकोळकर हे फरार आहेत. ते मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून फरार असल्याने ‘एसआयटी’ला त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. संशयित वाघमारेच्या चौकशीत कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याने महाराष्ट्राचे एसआयटी पथक रविवारी बंगलोरला रवाना झाले. या पथकाने सोमवारी बंगलोर एसआयटीच्या अधिकाºयांशी चर्चा करून वाघमारेकडे तासभर चौकशी केल्याचे समजते. याबाबत मात्र गोपनियता पाळली आहे.
>समोर आल्यास वाघमारेला ओळखू
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी परशुराम वाघमारेला माझ्यासमोर आणले तर त्याला ओळखु, अशी माहिती पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदाराने कोल्हापुरात प्रसारमाध्यमांना सोमवारी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयीत हे धार्मिक संस्थांशी संबंधित आहेत. त्यांचा शुभ, अशुभ गोष्टींवर विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल शुभ मानून त्याच पिस्तुलातून अन्य दोन हत्या केल्याचा संशयही या साक्षीदाराने व्यक्त केला आहे.