हेर्लेत मारहाणीनंतर वेटरची आत्महत्या
By admin | Published: May 14, 2016 01:39 AM2016-05-14T01:39:20+5:302016-05-14T01:39:20+5:30
हॉटेलबाहेर घडला प्रकार : सातारा येथील हॉटेलमालकासह तिघांकडून कृत्य
हातकणंगले : हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजता नामदेव सुरेश आवडणकर (वय २७, रा. तोरस, ता. चंदगड) या वेटरला हॉटेलच्या बाहेर बोलावून सातारा येथील ‘राजयोग’चे मालक महेश देशपांडे, सातारा उपनिबंधक कार्यालयातील आॅफिस सुपरिंटेंडंट चेतन शामराव जावीर आणि दिशा कुंभार या तिघांनी लोखंडी सायकल चेनने मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने नामदेव आवडणकर हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन मोठ्या सिंटेक्स पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिला. नामदेव आवडणकर याची उत्तरीय तपासणी सीपीआर इस्पितळात सुरू आहे. या घटनेचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, नामदेव आवडणकर हा गेल्या वर्षी सातारा येथील हॉटेल राजयोगमध्ये वेटरचे काम करत होता. गेली पंधरा दिवस तो हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये काम करीत होता. सातारा येथे वेटरचे काम करत असताना त्याचे राजयोग हॉटेलमध्ये कामाला असलेल्या दीपा कुंभारशी जुळले होते. गेली पंधरा दिवस नामदेवने सातारा येथील राजयोग हॉटेलमधील काम सोडून तो येथे होता. मात्र येथे आल्यापासून तो तिला फोन करून त्रास देत होता. फोनवरून अश्लील संभाषण करीत असे, याचा जाब विचारण्यासाठी टाटा नॅनो कार एम एच ११ ए डब्लू १५४४ घेऊन दीपा कुंभार, राजयोग हॉटेलचे मालक महेश मधुकर देशपांडे आणि सातारा उपनिबंधक कार्यालयातील आॅफिस सुपरिंटेंडंट चेतन शामराव जावीर हे तिघे हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये आले. त्यांनी वेटरला हॉटेल बाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. दीपा कुंभार हिच्या हातात लोखंडी साखळी तर महेश देशपांडे यांच्या हातात सायकल चेन होती. भयभीत झालेला वेटर नामदेव पळत तिसऱ्या मजल्यावर गेला आणि पाण्याच्या टाकीत उडी मारली. नामदेवला पोहायला येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हातकणंगले पोलिस सायंकाळी सहा वाजता हॉटेल सोनलमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दीपा कुंभार, महेश देशपांडे आणि चेतन जावीर यांना ताब्यात घेऊन हातकणंगले पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. (प्रतिनिधी)