करवीर पंचायत समितीला इमारतीची प्रतीक्षाच
By admin | Published: May 19, 2015 12:38 AM2015-05-19T00:38:44+5:302015-05-19T00:48:16+5:30
पावसाळ्याची कर्मचाऱ्यांना भीती : पाऊस सुरू झाला की साप, उंदीर, घुशी, मुंगूस, आदी कार्यालयामध्ये मुक्कामाला
रमेश पाटील - कसबा बावडा -पावसाळा आला की, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भीती वाटते ती साप, उंदीर, घुशी, मुंगूस आणि भटक्या गावठी कुत्र्यांची. शनिवार-रविवार जोडून एखादी दुसरी सलग सुटी झाली, तर या जिवांचा वावर तर कार्यालयात अगदी बिनधास्त. जणू काही हे कार्यालय म्हणजे आपले हक्काचे घर आहे, असाच. हे चित्र आहे शहराच्या मध्यवस्तीतील परंतु जयंती नाल्याच्या कडेला व शाहू स्मारक भवन समोरील असलेल्या ‘करवीर पंचायत समिती’च्या इमारतीमधील. पावसामुळे भिंतीला आलेली ओल आणि छतावरुन गळणारे पाणी कार्यालयात सर्वत्र पसरल्यावर आपण नेमकं कुठं कामाला आहोत, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडल्याशिवाय राहात नाही.
करवीर पंचायत समिती जिल्ह्यातील सधन पंचायत समिती म्हणून ओळखली जाते. परंतु, या सधन पंचायतीला स्वत:ची अशी इमारत नाही. समिती सध्या ज्या जागेवर आहे ती भाड्याची जागा आहे. तसेच त्या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन इमारत बांधता येत नाही. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या नवीन प्रशस्त इमारतीचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. सध्या समितीचा कारभार एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहे. समितीचे सदस्य, प्रशासन, स्थानिक आमदार, खासदार व विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने करवीर पंचायत समितीची इमारत नजीकच्या काही वर्षांत होईल, अशी शक्यता दिसत नाही.
समितीचे सदस्य मासिक सभेवेळी सभागृहात आपल्याला अनुकूल असेच प्रश्न विचारतात. पुढे या प्रश्नाचे काय झाले, याची माहिती घेण्याची तसदीदेखील ते घेत नाहीत. तसे असते तर करवीर पंचायत समितीच्या जागेचा प्रश्न किंवा पर्यायी जागा याचा निर्णय मागेच झाला असता. जवळपास दोन वर्षे होत आली परंतु पंचायतच्या जागेचा तिढा सुटला नाही.
पंचायतच्या जागेच्या प्रश्नावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यात करवीरमधील सदस्य एका बाजूला, तर दक्षिणमधील सदस्य एका बाजूला. परंतु या दोन गटांच्या भांडणात सर्वच सदस्यांना आता इमारतीचा विसर पडत चालल्याचे चित्र आहे. पंचायत समितीचे काही सदस्य पंचायतची इमारत सध्या आहे त्या जागीच होऊ दे, असे म्हणत होते, तर काही सदस्य जागा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे दक्षिणेत शेंडापार्कजवळील जागेत पंचायतीला चांगली इमारत बांधूया, असे म्हणत होते. हा वाद खूप गाजला. अखेर तत्कालीन सभापती दिलीप टिपुगडे यांनी सध्याच्या जागेत किंवा जिल्हा परिषदेसमोरील जागेत किंवा शेंडापार्कमधील जागेत अशी कुठेही इमारत बांधा, परंतु एकदाची इमारत होऊ दे, असा पवित्रा घेतला होता. परंतु, पुढे हा प्रश्न तसाच भिजत राहिला. येत्या पंधरा दिवसांत पावसाला सुरुवात होईल. तेव्हा नेहमीप्रमाणे जयंती नाल्याला पाणी वाढू लागले की, साप, नाग, उंदिर, घुशी, मुंगूस यांचे आगमन करवीर पंचायत समितीत होईल. छतावरुन गळणाऱ्या पाण्याने दफ्तर खराब होईल, कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडेल, सर्वत्र दलदल होईल आणि चार महिन्यांनी पावसाळा संपेल आणि पंचायत समितीच्या नवीन इमारतीची चर्चाही संपेल.
इमारतीसाठी आंदोलन करणार
करवीर पंचायत समितीच्या इमारतीचा वाद गेली अनेक वर्षे सुरू आहे. शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून सर्वांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी जागा उपलब्ध करुन करवीर पंचायत समितीसाठी लवकरात लवकर इमारत बांधावी, अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य-करवीर पंचायत समिती