‘निर्मल ग्राम’ पंचायतींना धनादेशाची प्रतीक्षा
By Admin | Published: December 25, 2014 11:25 PM2014-12-25T23:25:08+5:302014-12-26T00:00:41+5:30
गांधीनगर, उजळाईवाडी : पुरस्कार प्रदान होऊन झाली तब्बल दोन वर्षे
रमेश पाटील -कसबा बावडा -करवीर तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी या दोन ग्रामपंचायतींना दोन वर्षांनंतरही ‘निर्मलग्राम’ बक्षिसाच्या रकमेचा धनादेश मिळालेला नाही. औरंगाबाद येथे शासनाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या दोन ग्रामपंचायतींना केवळ प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले होते. रोख रकमेचा धनादेश नंतर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
बक्षिसाची रक्कम मिळावी म्हणून या दोन ग्रामपंचायतींनी करवीर पंचायत व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही.
प्रत्येक गाव, तालुका निर्मलग्राम व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही अनुदान व बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून पुढे निरोगी, समृद्ध आणि सुखी जीवनासाठी मंत्र म्हणून प्रत्येक घरात शौचालये झाली. परिसर, शाळा, घराची अंगणे स्वच्छ होऊ लागली. पात्र ठरलेल्या गावांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशस्तिपत्र, शिल्ड व रोख रक्कम मिळाली. मात्र, याला तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी ही दोन गावे मात्र बक्षिसाच्या रकमेपासून वंचित राहिली आहेत.
बक्षिसाची रक्कम किती आहे, यापेक्षा ती मिळाली किंवा आपली ग्रामपंचायत बक्षिसास पात्र ठरली, याचाच अभिमान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना जास्त असतो. गांधीनगर आणि उजळाईवाडी या ग्रामपंचायतीची बक्षिसाची रक्कम प्रत्येकी चार लाखांच्या पुढे आहे. मात्र, त्यांना ती मिळालेली नाही याचे त्यांना वाईट वाटते. जिल्हा परिषदेकडे याबाबत पत्रव्यवहार व चौकशी केल्यानंतर निधी नाही.
निधी उपलब्ध झाल्यावर बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे उत्तर दिले जात असल्याचे या दोन ग्रामपंचायतीच्या सदस्यांतून बोलले जात आहे.
गांधीनगर ग्रामपंचायत, निर्मलग्राम झाल्यावर सर्वांना आनंद झाला. औरंगाबाद येथील कार्यक्रमाला अनेक सदस्य व ग्रामस्थ गेले. तेथे केवळ सत्कार करून प्रशस्तिपत्र व शिल्ड देण्यात आले. बक्षिसाची रक्कम नंतर धनादेशाद्वारे दिली जाईल, असे स्पष्ट केले; परंतु अद्याप अशी रक्कम गांधीनगर ग्रामपंचायतीला मिळालेली नाही. बक्षिसाची रक्कम फार मोठी आहे असे नाही; परंतु ती अद्याप न मिळाल्याने काम करण्यातला उत्साह कमी होतो.
- प्रतापराव चंदवाणी,
गांधीनगर, ग्रामपंचायत सदस्य