कुरुंदवाड पालिकेच्या इमारतीला घड्याळाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:21+5:302021-04-22T04:24:21+5:30

गणपती कोळी : कुरुंदवाड येथील पालिकेच्या संस्थांनकालीन इमारतीवर पूर्वीप्रमाणे घड्याळ बसविण्याचा सहा महिन्यांपूर्वी पालिका सभागृहात ठराव करण्यात आला आहे. ...

Waiting for the clock at Kurundwad Municipal Corporation building! | कुरुंदवाड पालिकेच्या इमारतीला घड्याळाची प्रतीक्षा!

कुरुंदवाड पालिकेच्या इमारतीला घड्याळाची प्रतीक्षा!

googlenewsNext

गणपती कोळी : कुरुंदवाड

येथील पालिकेच्या संस्थांनकालीन इमारतीवर पूर्वीप्रमाणे घड्याळ बसविण्याचा सहा महिन्यांपूर्वी पालिका सभागृहात ठराव करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी अद्याप आर्थिक तरतूद नसल्याने इमारतीच्या प्रवेशद्वारावरील शिखर घड्याळाविना सुने-सुने वाटत आहे. त्यामुळे घड्याळाची टिकटिक कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.

कुरुंदवाड शहर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली होते. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी पालिका अस्तित्वात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थानिकांनी पालिकेची इमारत बांधली. दोन मजली इमारतीला चौकोनी आकाराचे शिखर करून समोरच्या भागात मोठ्या आकाराचे घड्याळ लावण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना वेळ समजावा, या उद्देशाने हे घड्याळ बसविण्यात आले होते.

कालांतराने घड्याळ बंद पडल्याने पालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. गतवर्षी पालिकेने जुन्या इमारतीची डागडुजी केली. यावेळी इमारतीवर पूर्वीप्रमाणे पुन्हा घड्याळ बसविण्याचा निर्णय घेतला तसा पालिका सभागृहात ठरावही करण्यात आला.

घड्याळाचा खर्च काही लाखात आहे. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र निधीची तरतूद नसल्याने घड्याळाची टिकटिक अद्याप बंद असून ती कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.

--

मोराची प्रतिकृतीही बसविण्याची मागणी

पालिका इमारतीच्या शिखराच्या राष्ट्रीय पक्षी मोराची प्रतिकृती होती. घड्याळ आणि मोर पालिका इमारतीचे सौंदर्य होते. वारा आला की मोराची प्रतिकृती गोल फिरत होती. यावरून नागरिकांना वाऱ्याची दिशा समजत होती. तर घड्याळामुळे वेळ समजत होती. बदलत्या काळात दिशा आणि वेळ दर्शक गायब झाले आहेत. आता नागरिकांना वाऱ्याची दिशा आणि वेळेची गरज वाटत नसली तरी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घड्याळाबरोबर मोराची पूर्वीप्रमाणे प्रतिकृती उभारुन इमारतीची शान वाढवावी, अशी शहरवासीयांतून मागणी होत आहे.

फोटो - २१०४२०२१-जेएवाय-०३-पालिका इमारतीचे संग्रहित छायाचित्र.

Web Title: Waiting for the clock at Kurundwad Municipal Corporation building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.