अंडी पिल्ली बाहेर काढायला कुणाची वाट बघता ? जयंत पाटील यांची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:05 PM2019-08-03T15:05:34+5:302019-08-03T15:08:33+5:30
गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.
कोल्हापूर : गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीतून आऊटगोर्इंग सुरू असल्याबाबत विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, एखादा, दुसरा नेता गेला तरी त्यांचे स्थानिक विरोधक आमच्या संपर्कात आहेत. वैभव पिचड केवळ ६ हजार मतांनी निवडून आले होते. आता त्यांचे विरोधक आमच्याकडे येत आहेत. शिवेंद्रराजे गेले. मात्र शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत.
कॉंग्रेस आणि आम्ही एकत्र लढलो तर आम्ही सत्तेत येवू शकतो याची जाणीव असल्याने आम्ही आघाडी करूनच लढणार असल्याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला. आर्थिक पातळीवर राज्याची घडी विस्कटल्याचे सांगून पाटील यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. चाळीस हजार कोटींचा समृध्दी महामार्ग, सत्तर हजार कोटींचा हायपरलूप प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ याच्या घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे नाव कुणी घेत नाही. पाटबंधारे प्रकल्पावरील तरतूदही कमी केली गेली. आता तर नितीन गडकरी यांच्याकडील हे खाते काढून घेतल्याने तिकडूनही निधी मिळणार नाही.
देशाची अर्थव्यवस्थेचा क्रमवारी खालावली असून रिझर्व्ह बँकेकडून निधी घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. धडाधड नोकऱ्या जात आहेत. कंत्राटी कामगारांची संख्या वाढवली जात आहे. देशापुढे फार मोठे आर्थिक संकट येण्याचीच ही लक्षणे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘लोकमत’सर्वदूर, समतोल, वैविध्यपूर्ण
‘लोकमत’चा गौरव करताना जयंत पाटील म्हणाले, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. सर्वत्र ‘लोकमत’चा प्रभाव जाणवतो. विशेष म्हणजे बातम्यांचे वैविध्य खूपच आहे. राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या बातम्या असतात. कोणताही पूर्वग्रहदूषितपणा नाही. हे कोणा एका विचारधारेचे वृत्तपत्र आहे असे वाचताना वाटत नाही इतका समतोल ‘लोकमत’ने साधला आहे.