गडमुडशिंगीकरांना निर्णयाची प्रतीक्षा
By admin | Published: July 19, 2016 12:41 AM2016-07-19T00:41:19+5:302016-07-19T00:51:52+5:30
विमानतळ विस्तारीकरण : प्रस्तावाच्या कार्यवाहीला शासनाने गती द्यावी
कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणाबाबत ‘ना हरकत’ ठराव देण्याची तयारी दर्शविलेल्या गडमुडशिंगी ग्रामस्थांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीची आवश्यकता आहे. संबंधित जमीन संपादित करण्यासाठी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव महत्त्वाचा आहे. याबाबतचा सकारात्मक ठराव काही अटींवर देण्याची तयारी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी जूनच्या अखेरच्या आठवड्यात दर्शविली. यानंतर विमानतळ विस्तारीकरणासह विविध प्रकल्पांसाठी गडमुडशिंगी येथील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला व अन्य मागण्यांबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ३० जूनला झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी मुडशिंगी ग्राम विभाजनात गेलेले क्षेत्र परत मिळावे, दूधगंगा डावा कालव्यासाठीचा आणि विमानतळ विस्तारीकरणासाठीच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या तिन्ही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली होती.
यानंतर अद्यापही या ग्रामस्थांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न आणि ठरावासाठी व्यतीत झालेला कालावधी लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागण्यांचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाला सादर होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव सादरीकरणाची कार्यवाही वेगाने होणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
निर्णयानंतरच ठरावाची कार्यवाही
पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला नाही. गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या कॅनालबाबतच्या बैठकीत प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी विमानतळाबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव देण्यासंदर्भातील विचारणा केली.