‘शिवपुतळा’च्या कामासाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:44 PM2020-03-11T14:44:37+5:302020-03-11T14:46:14+5:30
शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे.
विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा सुशोभीकरणाचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्यात जून २०१९ मध्ये सुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या घडीव दगडांमध्ये करावे. त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला.
शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली. ती मान्य करून विद्यापीठाने काम सुरू केले. सुशोभीकरणाच्या कामासाठी एकूण ४५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील घडीव दगड लावण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्यपालांची मान्यता घेणे आवश्यक आहे.
मान्यतेसाठी विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून पत्रव्यवहार केला आहे. ही मान्यता प्राप्त होताच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घडीव दगड लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, या कृती समितीने संंबंधित काम दि. १ एप्रिलपासून सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या सुशोभीकरणाअंतर्गत विद्युतीकरण, पादचारी मार्ग, आदी स्वरूपांतील काम पूर्ण झाले आहे. संरक्षक कठड्याला बाहेरून घडीव दगड लावण्याच्या कामासाठी आर्थिक खर्च करण्यासंबंधी राज्यपालांची मान्यता घेण्याबाबतचा पत्रव्यवहार झाला आहे. मान्यता प्राप्त होताच लगेच काम सुरू केले जाईल. या आठवड्यात मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दि. १५ मार्चपासून हे काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्याला विलंब लागणार असल्याचे दिसते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे ध्येय आहे.
-डॉ. विलास नांदवडेकर,
कुलसचिव