हेल्पलाईनलाच ‘हेल्प’ची प्रतीक्षा
By admin | Published: March 23, 2015 01:00 AM2015-03-23T01:00:37+5:302015-03-23T01:00:37+5:30
पंचगंगा नदी प्रदूषण : टोल फ्री क्रमांक कुचकामी; गांभीर्याचा अभाव
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर--पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी तक्रारी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८००२३३१२१९ या टोल फ्री क्रमांकालाच मदतीची प्रतीक्षा आहे. २४ तास टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवून घेण्यासाठी दीड लाखांचे रेकॉर्डिंग यंत्र बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर मनपा अणि इचलकरंजी नगरपालिकेने निम्मे-निम्मे पैसे देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंंडळाला पैसे न देता ठेंगा दाखविला आहे. कार्यालयीन वेळेतही तक्रारीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने हेल्पलाईन कुचकामी ठरली आहे.
नदीकाठावरील ३८ गावांचे व कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळते. परिणामी नदीवरील योजनेतून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषणप्रश्नी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडे १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल देण्यात आला.
‘प्रदूषण’च्या आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पंचगंगा प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार उपाययोजनांच्या पाठपुराव्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती कार्यरत आहे. प्रदूषणप्रश्नी सूचना, तक्रारी, उपाय ऐकून घेण्यासाठी १७ जानेवारी २०१५ रोजी येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने टोल फ्री क्रमांक सुरू केले. टोल फ्री क्रमांकावरून तक्रारी नोंदवून घेण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, रेकॉर्डिंग यंत्रणा नसल्याने कार्यालयीन वेळेत तक्रारींची नोंद घेतली जाते.
फोन रिसिव्ह करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. यामुळे अनेकवेळा फोन वाजूनही कोणी उचलत नाहीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपल्या कामातून वेळ मिळाल्यास फोन रिसीव्ह करतात. तक्रार नोंदवून घेतात. नोंदवून घेतलेल्या बहुतांशी तक्रारीचे पुढे काहीही होत नाही, अशी नागरिकांची मानसिकता होत आहे. आतापर्यंत टोल फ्री क्रमांकावर २० ते २२ तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. रेकॉर्डिंग यंत्रासाठी उपसमितीच्या आदेशानुसार हे पैसे कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी नगरपालिका द्यायचे आहे. त्यासाठी ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
टोल फ्री क्रमांकावर चोवीस तासांत कधीही तक्रार नोंदवून घेण्यासाठी रेकॉर्डिंग यंत्र बसविण्यात आलेले नाही. यंत्रासाठी आवश्यक पैशांसाठी कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, अजून पैसे मिळालेले नाहीत. कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवून घेतली जाते.
- मनिष होळकर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी
टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अनेकवेळा फोन रिसिव्ह केला जात नाही. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पुढे काहीही होत नाही. त्यामुळे हेल्पलाईन कुचकामी ठरत आहे. ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने त्वरित २४ तास हेल्पलाईन कार्यान्वित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.
- बंडू पाटील, अध्यक्ष, स्वा. शेतकरी युवा आघाडी