जयप्रभा स्टुडिओला प्रतीक्षा चित्रीकरणाची
By admin | Published: December 16, 2015 12:02 AM2015-12-16T00:02:55+5:302015-12-16T00:07:03+5:30
‘हेरिटेज वास्तू’वर शिक्कामोर्तब : कोल्हापूरचे वैभव; उच्च न्यायालयाच्या निकालामुळे चित्रपट निर्मितीशी संबंधितांच्या आशा पल्लवित
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही ‘हेरिटेज वास्तू’ म्हणूनच उच्च न्यायालयानेही निकालाद्वारे पुन्हा एकदा मोहोर लावली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अगदी पाणी देणाऱ्या स्पॉट बाईजसह दिग्दर्शक-निर्मात्यांपर्यंतच्या सर्व घटकांना हा कोल्हापूरचं वैभव असणारा स्टुडिओ पुन्हा एकदा सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जयप्रभा स्टुडिओची व्यावसायिक कारणांसाठी विक्री करण्याचा घाट स्टुडिओच्या सध्याच्या मालकीण पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी २०१२ मध्ये घातला होता. यामध्ये प्रथम अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने याला विरोध केला. पुढे चित्रपट महामंडळासह व्यावसायिक व कोल्हापूरकरांनीही मोर्चा, आंदोलनांद्वारे साडेतीन एकरांतील हा स्टुडिओ वाचविण्यासाठी प्रयत्न केले. महामंडळ स्थानिक न्यायालयात गेले. शासनाने या वास्तूची जागा भूसंपादन कायद्याखाली आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती, मात्र, ही मागणी न्यायालयाने पुढे फेटाळून लावली. नंतर दिवाणी न्यायालयात महामंडळाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विरोधात या हेरिटेज वास्तूचा ‘बी ग्रेड’मध्ये समावेश झाला असून, या वास्तूची पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेशिवाय विक्री करता येणार नाही, असा युक्तिवाद केला. यात कोल्हापूर संस्थानकडून स्टुडिओ खरेदी करताना त्याचा वापर चित्रपट निर्मितीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी करू नये,’ अशी अट ‘भालजी पेंढारकर यांना घातली होती. तीच अट मंगेशकर यांच्यावरही बंधनकारक आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा व्यापारी कारणासाठी वापर करू नये. त्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती पाडू नयेत, अशीही मागणी महामंडळाने या दाव्यात केली. त्यानंतर पुढे हा वाद उच्च न्यायालयात गेला. त्यात राज्य सरकार व कोल्हापूर महानगरपालिकेला प्रतिवादी करण्यात आले होते. त्याचा निकाल सोमवारी (दि. १४) लागला. आता उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल पुढे सर्वोच्च न्यायालयातही कायम राहावा, ही अपेक्षा सर्व कलाकार व समस्त कोल्हापूरकरांची आहे.
या स्टुडिओशी संबंधित अनेकांच्या आठवणी निगडित आहेत. त्यामध्ये भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, दामले-फत्तेलाल, अनंत माने या दिग्गजांसह अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे, अरुण सरनाईक, आशा काळे, बेबी शकुंतला, रमेश देव, सीमा देव, राजशेखर ते अलीकडचे भास्कर जाधव, यशवंत भालकर अशा कितीतरी असामींचा समावेश आहे. त्यांची कारकीर्द याच स्टुडिओत घडली आहे. मराठी चित्रपट म्हटले की, मुंबईपूर्वी कोल्हापूरचा दबदबा अगदी २०१० पर्यंत होता. यात सर्वांत कमी खर्चात ‘जयप्रभा’मध्ये चित्रीकरण होत असे. कलाकार मंडळींसह पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ येथे मिळेल त्या मेहनतान्यावर मिळत होती. मात्र, भालजी पेंढारकर यांच्यानंतर स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडे आल्यानंतर मात्र यात बदल झाले. स्टुडिओ चालत नाही, दुरुस्ती-देखभालीचा खर्चही परवडत नसल्याचे कारण मंगेशकर देत होते. सद्य:स्थितीत मंगेशकर कुटुंबीयांकडून या स्टुडिओच्या देखभालीसाठी तिघांची नेमणूक केली आहे. यामध्ये एक व्यवस्थापक व दोन कर्मचारी आहेत. येथे केवळ झाडलोट आणि देखभालच केली जाते.
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमी जनतेच्या व चित्रपटसृष्टीशी संबंधितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्टुडिओमध्ये पुन्हा चित्रीकरण करण्यास मिळणार, ही आशा आता पुन्हा बहरली आहे.
दृष्टिक्षेपात स्टुडिओ
भालजी पेंढारकर यांच्याकडून स्टुडिओ लता मंगेशकरांच्या ताब्यात
चित्रपटनिर्मितीसाठीच वापरण्याची अट
लता मंगेशकर यांच्याकडून २०१२ मध्ये स्टुडिओच्या विक्रीचा घाट
चित्रपट महामंडळ, कोल्हापूरकर यांच्याकडून विरोधासाठी मोर्चा
पुरातत्व खात्याच्या मान्यतेशिवाय विक्री करता येणार नसल्याचा महामंडळाचा न्यायालयात दावा
स्टुडिओ हेरिटेज वास्तू असल्यावर उच्च न्यायालयाची मोहोर