मनपा शाळेला गतवैभवाची प्रतीक्षा
By admin | Published: February 18, 2015 11:35 PM2015-02-18T23:35:36+5:302015-02-18T23:43:13+5:30
प्रभागात निवडणुकीचे वारे : नगरसेवकांचा जनसंपर्क चांगला, पण समस्या सोडविण्यात कमी
कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील श्री शाहू विद्यालय काही वर्षांपूर्वी भागातील एक उत्तम शाळा म्हणून प्रसिद्ध होती; पण स्थानिक नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्र्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळेचे वैभव हरवले असून, शाळा शेवटची घटका मोजत आहे. गरीब, मध्यमवर्गीय लोकांची वस्ती असलेल्या या प्रभागात ही शाळा महत्त्वाची आहे. त्यामुळे शाहू विद्यालयाला गतवैभव कधी मिळणार असा रहिवाशांचा प्रश्न आहे. याबरोबरच इतर प्रभागाप्रमाणे येथे देखील आयुर्मान संपलेल्या ड्रेनेज लाईन, तुंबलेल्या गटारी अशा समस्या कायम आहेत.नगरसेवकांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे; पण नागरी समस्या सोडविण्यात ते कमी पडत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. या प्रभागात काही भाग दाटीवाटीच्या वस्तीचा असल्यामुळे येथे मूलभूत सुविधांची मोठी गरज आहे. भागातील ड्रेनेजलाईनचा विस्तार आणि आधुनिकीकरण करणे ही सर्वांत प्रमुख बाब बनली आहे.
तोरस्कर चौक प्रभागात गत दहा वर्षांपासून झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक ठरल्याचा इतिहास आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आठशे ते एक हजार मते घेणारा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे प्रत्येक उमेदवार एक-एक मतासाठी झगडतो, असे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. आता प्रभाग रचना पूर्ण होऊन दहा वर्षे झाली आहेत. तरीही, गतवेळच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रभाग रचना होवो अगर न होवो, येथील लढत ही कायम रंगतदारच असते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे.
उर्वरित आठ महिन्यांत सुुमारे ७५ लाख रुपयांची नियोजित कामे आहेत. यामध्ये संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलणे याला प्राधान्य असेल. प्रभागात एलईडी बल्ब बसविण्याचा मानस आहे. श्री शाहू विद्यालयाच्या इमारतीची डागडुजी अशी कामे होणार आहेत.
- दिगंबर फराकटे, नगरसेवक