लाईनबझारचे हॉकीपटू ‘आॅस्ट्रो टर्फ’च्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:55 AM2018-11-22T00:55:08+5:302018-11-22T00:55:12+5:30
रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : सरावासाठी आॅस्ट्रो टर्फ मैदान आम्हालाही उपलब्ध झाल्यास आम्हीसुद्धा हॉकीमध्ये राज्य ...
रमेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : सरावासाठी आॅस्ट्रो टर्फ मैदान आम्हालाही उपलब्ध झाल्यास आम्हीसुद्धा हॉकीमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवू शकतो, असा आत्मविश्वास लाईन बझारमधील हॉकी खेळाडू व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खेळाडू आॅस्ट्रो टर्फ मैदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या या खेळाडूंचा सराव मातीच्या मैदानावर सुरू आहे. तरीही हे खेळाडू या खेळात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत.
नुकतेच केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आॅस्ट्रो टर्फ बनविण्यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे लाईन बझार हॉकी मैदानावरील आॅस्ट्रो टर्फ मैदानाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये लाईन बझारमधील खेळाडूंची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यामुळे येथील खेळाडूंनाही सरावासाठी लाईन बझार हॉकी मैदानावर आॅस्ट्रो टर्फ व्हावे, असे सातत्याने वाटत आले आहे. त्यासाठी त्यांनी विविध पातळीवर यापूर्वी प्रयत्न केले आहेत व सध्याही ते करीत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून लाईन बझारात हॉकी खेळली जात आहे. आज घरोघरी एक हॉकीचा खेळाडू आहे. या खेळाच्या जोरावर अनेक तरुणांना पोलीस, रेल्वे, शिक्षण, बँका, सहकारी संस्था अशा अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व देश पातळीवर चमकले आहेत. पण केवळ आॅस्ट्रो टर्फ मैदानावरील सराव नसल्याने येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकले नाहीत. याची खंत येथील खेळाडू, प्रशिक्षक व हॉकी शौकिनांच्या मनात आजही घर करून आहे. मध्यंतरी या मैदानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार सतेज पाटील व महापालिका यांचेकडून निधी प्राप्त झाला होता.
लाईन बझारला हॉकीची पंढरी म्हणून ओळखले जाते. लाईन बझारच्या प्रत्येक घराघरांत हा हॉकीचा खेळ रुजला आहे, फुलला आहे. हॉकीच्या मैदानावर फारशा सुविधा नसतानाही हा खेळ दिवसेंदिवस बहरतच चालला आहे. मातीचे मैदान असल्यामुळे नेहमी नाकातोंडात मातीचा धुरळा जातो. मैदानावरील खडकावरून नेहमी पडायला होते. काही वेळेला मैदानावरील खडकावर आपटून चेंडू उसळी घेऊन खेळाडू जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत येथील खेळाडूंचे हॉकीवरील प्रेम जराही कमी झालेले नाही. त्यांना आता प्रतीक्षा आहे ती हॉकीची पंढरी असलेल्या लाईन बझारमध्ये आॅस्ट्रो टर्फ मैदान व्हावे याचीच. आॅस्ट्रो टर्फ व मातीच्या मैदानावरील सरावात खूप फरक आहे. आॅस्ट्रो टर्फ मैदानाचा सराव नसल्याने मातीच्या मैदानावरील सराव करणारे खेळाडू स्पर्धेच्या वेळी लगेचच दमतात. त्यामुळे ते सामन्याच्या वेळी आपली पुरेपूर चमक दाखवू शकत नाहीत. सध्या पुणे व मुंबई येथे अशी मैदाने आहेत. आंतरराष्ट्रीय सामने आॅस्ट्रो टर्फ मैदानावर होतात. त्यामुळे तिथे पोहचायचे असेल तर इथल्या खेळाडूंना आॅस्ट्रो टर्र्फ मैदानावरील सरावाशिवाय पर्याय नाही. हे मात्र निश्चित!