हस्ताक्षराच्या अहवालाची महिन्याभरापासून प्रतीक्षा
By admin | Published: November 30, 2015 01:00 AM2015-11-30T01:00:08+5:302015-11-30T01:10:34+5:30
फोटोग्राफर आत्महत्येचा तपास ठप्प : नेमके कारण अद्यापही अस्पष्टच
कोल्हापूर : खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड येथील आनंद फोटो स्टुडिओचे मालक आनंदराव दत्तात्रय चौगले यांच्या आत्महत्येचा तपास हस्ताक्षराचा अहवाल न मिळाल्याने ठप्प आहे.गेली महिनाभर जुना राजवाडा पोलीस पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडून चौगले यांच्या हस्ताक्षराच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. चौगले यांचे कुटुंबीय तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांचेही हात बांधले आहेत. त्यामुळे हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तपासाला गती येणार आहे. आनंदराव चौगले (वय ६५, रा. पोवार गल्ली, मंगळवार पेठ) यांनी दि. ३१ आॅक्टोबरला महाद्वार रोडवरील फोटो स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील, त्यांची दोन मुले व महापालिका सफाई कामगार धनाजी शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या धमक्यांमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते यावर काहीच बोलण्यास तयार नाहीत.
चौगले यांना श्लोक लिहिण्याचा छंद होता. त्यांनी वैयक्तिक डायरी संग्रही ठेवली होती. या डायरीसह त्यांची इन्कम टॅक्स रिटर्नची सही असणारी पावती पोलिसांनी ताब्यात घेऊन डायरीतील हस्ताक्षर, पावतीवरील सही व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर व सहीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसल्याने तपास पुढे सरकलेला नाही. पोलिसांनी चौगले यांच्या कुटुंबीयांना चिठ्ठीतील संशयितांवर तक्रार देण्यास विचारणा केली असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. पुणे येथील लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविलेले अहवाल सहा-सहा महिने प्राप्त होत नाहीत. मात्र, अहवाल लवकरात लवकर मिळावा, म्हणून पोलिसांनी तज्ज्ञांना पत्रव्यवहारही केला आहे. चौगले यांच्या कुटुंबीयांची तक्रार न देण्याची मानसिकता आणि हस्ताक्षर अहवाल प्राप्त होत नसल्याने या आत्महत्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपासच ठप्प झाला आहे. (प्रतिनिधी)
आनंदराव चौगले यांच्या आत्महत्येच्या तपासासंदर्भात त्यांचे हस्ताक्षराचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत. त्यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. तो लवकर मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तपासाला गती येईल.
- अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक