‘पार्वती वसाहत’ सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: September 24, 2015 11:17 PM2015-09-24T23:17:33+5:302015-09-24T23:54:42+5:30
२६६ एकरांमध्ये विस्तार : आशिया खंडातील सहकारातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत, योग्य नियोजनाची गरज--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या
घन:शाम कुंभार - यड्राव -येथील पार्वती औद्योगिक वसाहतीचा विस्तार २६६ एकरांमध्ये आहे. आशिया खंडामध्ये सहकारातील सर्वांत मोठी ही वसाहत आहे. दिवसेंदिवस येथील उद्योग विस्तार व अर्थकारणात वाढ होत असतानाच वसाहतीअंतर्गत सोयी-सुविधांच्या अपेक्षाही वाढत आहेत. यासाठीचे योग्य नियोजन झाल्यास निश्चितपणे उद्योजकांची येथे येण्यासाठी प्रतीक्षा असेल आणि त्यामुळेच येथील अर्थकारणाला अधिक बळकटी मिळेल.
ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर यांच्या पुढाकाराने सन १९८१ मध्ये वसाहतीची स्थापना झाली. या वसाहतीमध्ये सध्या टेक्स्टाईल्स, इंजिनिअरिंग, फौंड्री, पीव्हीसी पाईप, केमिकल उत्पादन, दुचाकी, चारचाकी वाहनांचे सुटे भाग उत्पादन यासह विविध उत्पादने होतात. यातील वीसहून अधिक उत्पादनांनी परदेशी बाजारपेठेत स्थान मिळवले आहे.
वसाहतीअंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारी, पथदिव्यांची चांगली सोय, अंतर्गत वृक्ष जोपासना, पोलीस चौकीची सोय, उद्योजकांना अखंडित विद्युत पुरवठा, कामगार प्रशिक्षण केंद्र, कामगार महिलांच्या मुलांसाठी पाळणा घर, महिलांसाठी स्वच्छतागृहे, रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र कार्यान्वित करणे, प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना त्याच्याअंतर्गत प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवण्यास बंधन करणे, उद्योगांना पुरेसा पाणीपुरवठा, उद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, आरोग्य सुविधा मिळणारे केंद्र यासारख्या सुविधा सध्या उपलब्ध असल्या तरी त्यामध्ये सातत्य व पुरेशा प्रमाणात मिळणे उद्योगवाढीसाठी पूरक आहे.
समाजातील आर्थिक दुर्बल व बारा बलुतेदारांचा रोजगार आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांनी अडीच एकर जागेमध्ये ग्रामोद्योग वसाहत निर्माण केली. परंतु, खादी ग्रामोद्योग विभागाकडून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी कोणतेच प्रोत्साहन व प्रयत्न झाले नाहीत. रस्ते, पाणी, गटारी, पथदिवे, आरोग्य याबाबतच्या सुविधा ग्रामपंचायतीकडून मिळत नाहीत. परंतु कररूपाने नगरपालिकेपेक्षाही केली जाणारी जादा आकारणी येथील उद्योजकांना परवडणारी नाही. पार्वती वसाहत कार्यक्षेत्राबाहेरही मोठ्या प्रमाणात उद्योग वाढत आहेत. त्याठिकाणी ग्रामपंचायतीने लाईट, रस्ता, पाणी, आदी सोयीसुविधा पुरविल्यास उद्योजक या परिसरामध्ये उद्योग काढण्यास पुढे येतील.
इंटरनेटद्वारे सध्या व्यवहार होत असल्याने इंटरनेट सिग्नलची क्षमता वाढवण्याची गरज आहे. पुरेशा प्रमाणात उद्योगांना वीजपुरवठा होण्यासाठी क्षमता वाढवून तेथे तज्ज्ञ लोकांची नेमणूक झाल्यास उद्योगांना अखंडित वीजपुरवठा होऊ शकेल. उद्योजक, कामगार, ग्राहक या सर्वांना तो फायदेशीर ठरेल व उत्पादनवाढीसाठी पूरक होईल. पार्वती औद्योगिक वसाहत व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे वसाहत प्रगतीपथावर आहे. परंतु, उद्योग
विस्तार वाढ, नवनव्या उद्योजकांच्या आवकेमुळे आणखी योग्य नियोजन झाल्यास उद्योजकांना स्थिर होणे सोपे होईल.
वसाहतीमधील उद्योग विस्तारवाढीमुळे विकास-कामांसाठी मर्यादा येत आहेत. उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी आहे. उद्योजकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा न टाकता सर्व सुविधा देण्यासाठी वसाहत प्रयत्नशील आहे.
- राजेंद्र पाटील-यड्रावकर,
वसाहत अध्यक्ष
महावितरणकडून अखंडित वीज पुरवठा बीएसएनएल-कडून इंटरनेट सेवा, खादी ग्रामोद्योगकडून नवउद्योजकांना प्रोत्साहन, ग्रामपंचायतीकडून केली जाणारी उद्योगावरची कर आकारणी या समस्यांचे निराकरण उद्योजकांना पूरक ठरेल. - अनिल बागणे,
अध्यक्ष : पार्वती औद्योगिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन