नाट्यगृहाला केशवरावांच्या पुतळ्याची प्रतीक्षा
By admin | Published: August 6, 2015 11:55 PM2015-08-06T23:55:49+5:302015-08-06T23:55:49+5:30
प्रस्ताव प्रलंबित : माजी महापौरांचे आश्वासन हवेतच, आराखड्यात समावेशच नव्हता
इंदुमती गणेश -कोल्हापूर -संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने पुन्हा नव्या दिमाखात साकारलेल्या नाट्यगृहाला केशवरावांच्या पुतळ््याची प्रतीक्षा आहे. नाट्यगृहाच्या आराखड्यात पुतळ््याचा समावेशच नसल्याने नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचा पडदा केशवरावांच्या पुतळ््यानेच उघडेल, हे माजी महापौरांचे आश्वासन हवेतच विरले आहे. केशवरावांचे १२५ वे जयंती वर्ष पुतळ््याविना साजरे करावे लागणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणापूर्वी झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या संचालकांनी माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यापुढे नाट्यगृहाच्या आवारात संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा असावा, अशी मागणी केली होती. त्यावर माजी महापौरांनी नूतनीकरण झाल्यानंतर या नाट्यगृहाचा पडदा उघडेल तेव्हा आवारात केशवरावांचा पुतळा असेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे. नाट्यगृहाच्या जवळपास २५ कोटींच्या आराखड्यात पुतळ््याचा कुठेही समावेश नसल्याने पहिल्या टप्प्यात पुतळा बसविण्याचे कष्ट महापालिका प्रशासनाने घेतलेले नाही. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेनेही नंतर त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या नाट्यगृहाच्या आवारात केशवरावांचा पुतळा असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट अशी की पुतळ््यासाठी प्रवेशद्वाराजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. आराखड्याचा दुसरा टप्पा १४ कोटींचा असून तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावेळी पुतळा बसविण्यात येईल, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात
आले आहे.
नाट्यगृह, खासबाग मैदानाचे काम अंतिम टप्प्यात
नाट्यगृहाचे आणि खासबाग कुस्ती मैदानाचे नूतनीकरण आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या नाट्यगृहात खुर्च्या बसविण्याचे काम सुरू आहे. शिवाय वीज कनेक्शन, साऊंड सिस्टीमची चाचणी, परिसराची स्वच्छता, परवाने अशा तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याने नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन केशवराव भोसलेंच्या जयंतीला होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतीकात्मकरीत्या नाट्यगृहाच्या आवारात केशवराव भोसले यांची जयंती साजरी करणार आहे.
नाट्यगृहाच्या मूळ आराखड्यात केशवराव भोसले यांच्या पुतळ््याचा समावेश नसल्याने पहिल्या टप्प्यात तो बसविता आलेला नाही. मात्र, पुतळ््यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरणाच्यावेळी पुतळा बसविण्यात येईल.
- अनुराधा वांडरे, प्रकल्प अधिकारी