विमानाची प्रतीक्षा आणखी दोन वर्षे
By admin | Published: May 17, 2016 11:58 PM2016-05-17T23:58:37+5:302016-05-18T00:10:25+5:30
धनंजय महाडिक : कंपन्यांशी चर्चेअगोदर सुविधा देणे प्राधिकरणास अशक्य
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाबाबत आठ दिवसांपूर्वी संबंधित विभागांशी चर्चा केल्यानंतर ‘विमान टेक आॅफ’ होण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील, असे अधिकाऱ्यांचे मत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिल्यांदा विमान कंपन्यांशी चर्चा करण्याअगोदर तिथे सुविधा देणे शक्य नसल्याचे भारतीय विमानतळ पतन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विमानतळाला सुविधा दिल्यातर विमान सेवा सुरू होईल, या विषयावर केंद्रीय मंत्री शर्मा यांच्याशी चर्चा केली; पण मुळात येथे कोणत्या कंपन्या येण्यास तयार आहेत, हेच माहिती नाही तर येथे सुविधा कशा द्यायच्या? असा प्रश्न प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा आहे.
पहिल्यांदा इच्छुक कंपन्यांचे प्रस्ताव घ्यावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून आपले प्रयत्न सुरू असल्याने लवकरात लवकर विमान सेवेचा प्रश्न मार्गी लावू खासदार महाडिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘टॉप थ्री’ खासदार
खासदार म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल व देशात ‘टॉप थ्री खासदार’ म्हणून निवड झाल्याबद्दल धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. महाडिक म्हणाले, गेल्या दोन वर्षांत संसदेत सामान्य जनतेशी संबंधित ५३८ प्रश्न उपस्थित करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर-कोकण रेल्वेचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान असून, दीनदयाल ज्योती योजनेतून विद्युत खांबासाठी २४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून रस्ते प्रकल्पासाठी २०८ कोटींचा निधी मंजूर झाला असून ‘बीएसएनएल’चे २८ टॉवर उभे करण्यात यश आले आहे.
जिल्हा ‘अॅनिमिया’मुक्त करणार
विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या महिला आरोग्याकडे कमालीच्या दुर्लक्ष करीत असून ६० टक्क्यांपेक्षा अधिक महिला अॅनेमियाग्रस्त आहेत. यासाठी ‘खासदार ग्राम आरोग्य संवर्धन कार्यक्रमा’च्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्हा अॅनेमियामुक्त करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी केंद्राकडून भरीव निधी देणे, गडकिल्ले संवर्धनाबरोबरच उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापूर ब्रॅँडिंगची संकल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘कोल्हापूर ब्रॅँडिंग’
अलीकडील आंदोलने व प्रकल्पांना विरोध पाहता उद्योगांमध्ये नवीन गुंतवणूक होत नाही. यासाठी येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी व उद्योजकांबरोबर बैठक घेऊन कोल्हापूर ब्रॅँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, समीर शेठ, रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड, आदी उपस्थित होते.
...म्हणूनच पक्षवाढीकडे दुर्लक्ष
संसदीय पातळीवर आघाडीवर असणारे खासदार पक्षीय पातळीवर मागे कसे? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाडिक म्हणाले, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमुळे आपण खासदार झाल्याने स्थानिक राजकारणात भाग घेत नाही. महापालिका निवडणुकीत शरद पवार यांनी आदेश दिला असता तर भाग घेतला असता; पण त्यांची परवानगी घेऊनच आपण बाजूला राहिलो.