राजोपाध्येनगर क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2017 12:05 AM2017-02-02T00:05:25+5:302017-02-02T00:06:21+5:30
काम संथगतीने : मुदत संपूनही काम अपूर्णच; आणखी निधीची गरज
अमर पाटील-- कळंबा --कोल्हापुरात व उपनगरांत बॅडमिंटन व बॉक्सिंग खेळासाठी दर्जेदार कोर्ट विकसित व्हावे, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत या हेतूने राजोपाध्येनगरात शासनाच्या प्राथमिक सोयी-सुविधा योजनेंतर्गत भव्य क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. एक कोटी पाच लाख फक्त इमारतीचा सांगाडा उभा करण्यात खर्ची पडले आहेत. संथगतीने सुरू असणारे संकुलाच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जाणार कधी, असा प्रश्न क्रीडाप्रेमींसमोर उभा आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शहरासह उपनगरांसाठी बॅडमिंटन क्रीडा संकुलाच्या मंजुरीसाठी व अनुदानासाठी गळ घातली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन कोटी २५ लाखांचे अनुदान मंजूर केले.
महापालिकेच्या हद्दीत करावयाच्या प्राथमिक सोयी-सुविधांच्या विकासकामांतर्गत क्रीडांगण व बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यासाठी टाकाळा येथे एक कोटी २० लाखांचे दर राजोपाध्येनगरात एक कोटी पाच लाखांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले. ३० डिसेंबर २०१४ च्या पालिका ठरावान्वये निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास १ आॅक्टोबर २०१५ रोजी सुरुवात झाली. निविदा प्रक्रियेन्वये एक वर्षाच्या आत काम पूर्ण करून देणे ठेकेदारास बंधनकारक होते.
विकासकामांसाठी राज्य शासनाकडून निम्मा व पालिकेकडून निम्मा हिस्सा खर्च करावा लागतो. संकुलाच्या प्रकल्पाची मूळ खर्चमर्यादा एक कोटी पाच लाख इमारत उभी करण्यात संपल्याने उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पालिकेस नव्याने प्रस्ताव सादर करावा लागेल. शासनाने प्रस्ताव नाकारल्यास हेच काम पालिकेस स्वनिधीतून पूर्ण करावे लागेल.
क्रीडा संकुलाचे दरवाजे, खिडक्या, प्रकाश व्यवस्था, प्रेक्षक बैठक व्यवस्था, स्टोअर रूम, ड्रेसिंग रूम ही कामे प्रलंबित असून, सध्या इमारतीच्या गिलाव्याचे काम सुरू आहे.
क्रीडा संकुलाभोवती संरक्षक भिंत न उभारल्यास भविष्यात इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो. प्रलंबित कामाची यादी पाहता संकुलाचे काम पूर्णत्वास जाणार कधी याचे उत्तर प्रशासनासच ठाऊक़ उपनगरातील खेळांचा वनवास संपण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे, ही मागणी क्रीडाप्रेमींतून जोर धरत आहे.
बजेट : वाढलेच
या क्रीडा संकुलाच्या कामास सुरुवात झाल्यानंतर एक कोटी पाच लाख रुपयांचा मंजूर निधी फक्त इमारतीचा सांगाडा उभारण्यात खर्ची पडला. मूळ बजेट वाढल्याने सहा महिने काम बंद होते. दोन भव्य बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक बॉक्सिंग कोर्ट, प्रेक्षक बैठकीची व्यवस्था, स्टोअर व ड्रेसिंग रूम, प्रकाशव्यवस्था या कामांचा यात समावेश होता. संकुलातील दरवाजे, खिडक्या, प्रेक्षक गॅलरी, प्रकाशव्यवस्था, पायऱ्या, ड्रेसिंगरूम ही कामे आजही प्रलंबित आहेत.