इच्छुकांना मतदारांना भेटण्यासाठी जुन्या आठवणींना जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:07+5:302021-03-22T04:23:07+5:30
दुर्गमानवाड : होऊ घातलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या निवडणुकीला वेग आला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार या ...
दुर्गमानवाड : होऊ घातलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या निवडणुकीला वेग आला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार या आशेने दोन्ही आघाडीचे राधानगरी तालुक्यातील इच्छुक उमेदवार ठरावधारकांच्या जुन्या आठवणीना उजाळा देत आपापल्यापरीने गाठीभेठी घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
यावेळी गोकुळची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार हे चित्र स्पष्ट झाले असून, दोन्ही आघाडीत उमेदवारी मिळवण्यासाठी या तालुक्यात इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यांचे कार्यकर्ते मात्र दूध संस्था ठरावधारकांच्या गाठीभेठी घेऊन, आपण कोणामार्फत आलो आहे हे व्हिजिट कार्ड देऊन सहकार्य करा, असे आवाहन करत आहेत.
या तालुक्यात दोन्ही आघाडीत इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तारूढ आ. पी. एन. पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या आघाडीतून ‘भोगावती’चे विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे, भारती विजयसिंह डोंगळे, तर माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यामार्फत राजेंद्र भाटळे हे उमेदवारी अर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. तसेच विरोधी मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीतून विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, विजयसिंह मोरे, अभिजित तायशेटे व ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे कट्टर समर्थक प्रा. किसन चौगले हे इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये दोन्ही आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, इच्छुक सर्व उमेदवार आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या आशेने कामाला लागले आहेत.