वाकरे होणार जिल्ह्यातील पहिले सौरऊर्जा गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:02+5:302021-04-11T04:23:02+5:30
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) गावाला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधून ४९ लाख ९६ हजार रुपये सौरऊर्जा प्रकल्पासाठी ...
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) गावाला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधून ४९ लाख ९६ हजार रुपये सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. यातून नळपाणी पुरवठा योजनेला लागणारी वीज निर्मिती होणार आहे. यात पथदिवे, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा या शासकीय कार्यालयांना लागणारी जादा वीज निर्मितीची क्षमता असणारा ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. असा प्रकल्प उभारणारे जिल्ह्यातील वाकरे पहिले गाव आहे.
नळपाणी पुरवठा योजनेसाठी प्रतिमहिना ८० ते ९० हजार वीज बिल येत असल्याने ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी निधी देताना दमछाक होत होती. याचा विचार करून सरपंच वसंत तोडकर यांनी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरू केला. यासाठी लागणाऱ्या सर्व अटी, शर्ती पूर्ण करून प्रस्ताव सादर केला.
या योजनेतून १०० किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पासाठी ४९ लाख ९६ हजार रुपये मंजूर झाले आहेत. यावर २० अश्वशक्तीचा नळपाणी पुरवठा विद्युत पंप चालणार आहे; पण याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, चावडी, जलशुद्धिकरण केंद्र या शासकीय कार्यालयांच्या वापरासाठी आणखी ३६ किलोवॅट विजेची गरज असल्याने या प्रकल्पात ही क्षमता वाढ करण्यासाठी आणखी लागणारे २५ ते ३० लाख रुपये १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणार आहे.
चौकट
गावतळ्याचे सुशोभीकरण होणार
सौरऊर्जा पॅनेल उभारणीसाठी किमान दहा गुंठे जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असणे आवश्यक आहे. यासाठी गावातील दुर्लक्षित तळ्यातील गाळ काढून यात आरसीसी काँक्रीट पिलर उभा करून त्यावर सौरऊर्जेचे पॅनेल उभे करण्यात येणार आहेत. तळ्यासाठी खा. मंडलिक यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
चौकट
निधी उपलब्ध
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधून ४९ लाख ९६ हजार रुपये मंजूर.
१५ व्या वित्त आयोगातून - २० लाख
लोकसहभागातून - ७ लाख
प्रतिक्रिया
वसंत तोडकर (सरपंच)
खा. संजय मंडलिक, जिल्हा परिषद, महाऊर्जा विभाग व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वर्षाला १० ते १२ लाख वीज बिलाची बचत होणार आहे.