‘वालचंद’साठी मंत्रिपद धुडकावले
By admin | Published: January 15, 2017 01:10 AM2017-01-15T01:10:48+5:302017-01-15T01:10:48+5:30
संजयकाका पाटील : जशास तसे उत्तर देणे हा नाईलाज होता!
सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय वाचविण्याचा विषय ज्यावेळी चर्चेत होता, त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. अनेक राजकीय नेत्यांनी, तज्ज्ञांनी मला या प्रकरणात न पडण्याबाबत सांगितले, तरीही मंत्रिपदाची संधी धुडकावून मी ‘वालचंद’ वाचविण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी दिले.
येथील वालचंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले की, महाविद्यालयाशी संबंधित काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी गुंडगिरीच्या माध्यमातून काही लोकांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. हा विषय पेटला असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी काही लोकांनी मला वेड्यासारखे न वागण्याची सूचना केली. माझेही विचार काहीवेळ बदलले. कोणाच्या महाविद्यालयात किती लक्ष घालायचे आणि तिकडे आपण डावावर लागायचे, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. त्यानंतर महाविद्यालयाचा एकूण प्रवास आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याची ख्याती लक्षात घेतल्यानंतर जिल्'ाचे वैभव म्हणून ‘वालचंद’च्या विषयात लक्ष घालण्याचा निर्णय मी घेतला. मंत्रिपदाच्या संधीची कोणतीही पर्वा केली नाही.
सुरुवातीला चांगुलपणा दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव महाविद्यालयात येऊन जशाच तसे उत्तर द्यावे लागले. एक चांगली संस्था गुंडगिरीच्या जोरावर आणि खोट्या कागदपत्राच्या जोरावर कोणीतरी गिळंकृत करू पाहात होते. आता त्यांना विरोध केला नसता, तर भविष्यात अशाच गोष्टींच्या जोरावर ते यशस्वी झाले असते. महाविद्यालयाचे नुकसान होत असल्याने न्यायालयीन निर्णयाची वाट पाहणेही आम्हाला तोपर्यंत शक्य नव्हते. आता कोणतीही अडचण महाविद्यालयासमोर नाही. अशा महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीने सहभागी होणे योग्य की अयोग्य, हे मला माहीत नाही, पण हे महाविद्यालय आम्हाला सांगलीचे वैभव वाटते. आता ते ख्यातीप्रमाणे पुढे जात आहे. माजी विद्यार्थ्यांनी धन नाही दिले तरी चालेल, पण तन आणि मन तेवढे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजकारणी शिक्षणसम्राटांकडून धनवंतांनाच प्रवेश
वालचंद महाविद्यालय ही गुणवत्तेवर आधारित शिक्षण देणारी संस्था आहे. खरेतर आम्हा राजकारण्यांच्या संस्थांचा गुणवत्तेशी फारसा संबंध येत नाही. धनवंत बापाच्या पोरांना प्रवेश देऊन आम्ही शिक्षणसम्राट होतो. मात्र, येथे तसे नसल्याने ‘वालचंद’बद्दल माझ्या मनात आदरभाव आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.