चालता बोलता इतिहास हरपला

By admin | Published: October 9, 2015 11:16 PM2015-10-09T23:16:59+5:302015-10-09T23:16:59+5:30

९0 वर्षे पंढरीची वारी : करनूरच्या १0५ वर्षांच्या मुक्ताबाई यांचे निधन

Walking History Harpala | चालता बोलता इतिहास हरपला

चालता बोलता इतिहास हरपला

Next

जहाँगीर शेख -- कागल : करनूर (ता. कागल) येथील मुक्ताबाई दत्तात्रय कदम -भोसले या १0५ वर्षीय वृद्धेचे वृद्धापकाळाने निधन झाले. या परिसरातील ‘मुक्ता माळकरीण’ याच नावाने परिचित असणारी ही वृद्धा म्हणजे चालता बोलता इतिहास होता. वयाच्या १३ व्या वर्षी वारकरी संप्रदायाची माळ धारण केल्यापासून आजतागायत त्यांनी विठ्ठल भक्तीत जीवन
व्यतीत करीत सलग ९0 वर्षे न चुकता आषाढी एकादशीची पंढरीची वारी केली. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला त्या पंढरपूरला जाऊन आल्या. करनूर ग्रामस्थांनी आणि हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली.
७ जून १९१0 ही मुक्ताबार्इंची जन्मतारीख. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी कोगनोळी (ता. चिकोडी) येथील दत्तात्रय कदम यांच्याशी बालविवाह झाला. मुक्ताबार्इंना सहा बहिणी, एक भाऊ असा परिवार होता.
आई प्लेगच्या साथीने वारली, म्हणून या सहा लहान बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी त्या माहेरी करनूरला परत आल्या, त्या कायमच्याच. वयाच्या १३ व्या वर्षी पंढरीची माळ घातली आणि तेव्हापासून त्या माळकरी म्हणून व्रथस्त जीवन जगत राहिल्या. हातमागावर विणलेली साडी, कपाळावर बुक्का, मुखी पांडुरंगाचे नाव. मात्र, बहिणींची लग्ने, भाऊ शंकर यांचा संसार उभा करण्यापर्यंत या माऊलीने अमाप कष्ट करत भोसले घराण्याला सावरले.
ग्रामपंचायत सदस्या, हनुमान भजनी मंडळाच्या एकमेव महिला सदस्या, सगळ्या गावात आदराचे स्थान असणारी मुक्ता माळकरीण म्हणजे चालता-बोलता इतिहास. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीला जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आरती, पाळणा, ओव्या, अभंग, भारुडे, हरीपाठ, रामायण, महाभारत सर्व तोंडपाठ. कोणतीही शाळा न शिकता हे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रजांचा कालखंड, स्वातंत्र्य चळवळ, कागलचे संस्थानिक राजे, करवीरकर
छत्रपती याचे ‘छबीने’ तत्कालीन गाव रचना, आणीबाणीचा कालखंड आदी गोष्टींवर त्या भरभरून बोलत. गेली दोन वर्षे त्यांची तब्येत बिघडली होती. २०१४ मध्ये आषाढी एकादशीची वारी चुकली म्हणून त्या बेचैन झाल्या. शेवटी घरच्यांनी २७ सप्टेंबर २0१५ रोजी त्यांना पंढरीला नेले. शुक्रवारी (दि. ९) त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन भाचे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.


सबला नारी
बालविवाह झाला मात्र त्यानंतर माहेर सावरण्यासाठी त्या परत सासरी गेल्या नाहीत. १९२५ च्या क ालखंडापासून पंढरीला तरुण वयात एकटीने जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान ही संपादन केले. तेही कोणत्याही शाळेत न जाता. ग्रामपंचायत सदस्या आणि पुरुषांच्या भजनी मंडळातील एकमेव महिला सदस्या. सबला नारीची व्याख्याच मूक्ताईने आपल्या जगण्यातून सांगितली.

Web Title: Walking History Harpala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.