लक्ष्मीपुरीतील रस्त्यावरून चालणेही झाले अवघड, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ते उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 PM2019-02-28T12:49:56+5:302019-02-28T12:53:59+5:30
आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड चालणेही मुश्किलीचे होऊन गेले आहे. पावसाळ्यात तर हा परिसर दलदलीतच बुडून जातो. गेल्या ४० वर्षांत येथील सर्व रस्त्यांना जर डांबर लागले नसेल तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला, कल्पकतेला आणि कार्यक्षमतेला जनतेने सलाम करावा लागेल.
कोल्हापूर : आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड चालणेही मुश्किलीचे होऊन गेले आहे. पावसाळ्यात तर हा परिसर दलदलीतच बुडून जातो. गेल्या ४० वर्षांत येथील सर्व रस्त्यांना जर डांबर लागले नसेल तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला, कल्पकतेला आणि कार्यक्षमतेला जनतेने सलाम करावा लागेल.
लक्ष्मीपुरीत ४० वर्षांपूर्वी रस्ते केले होते, असे त्या भागातील नागरिक, नगरसेवक सांगतात. त्यानंतर रस्त्यांवर कधीही डांबर टाकललेले नाही. खड्डे कधी बुजविले नाहीत. जयधवल बिल्डिंग ते चांदणी चौक, श्रमिक हॉल ते धवन भट्टी, धान्यबाजार ते पद्मा टॉकीजजवळील जैन मंदिर असे जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरातील रस्त्यांवर ‘डांबर दाखवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी कोणी स्पर्धा घेतली तर तेथे कोणालाही डांबर असलेला रस्ता सापडणार नाही, इतकी वाईट अवस्था झाली आहे.
लक्ष्मीपुरीत चारचाकी, दुचाकी वाहने चालविणे सोडाच; तेथून नागरिकांना चालत जातानाही अनेकांना पाय मुरगळून जखमी व्हावे लागले आहे. अनेक दुचाकी खड्ड्यांमुळे घसरल्याने नागरिक जखमी झाले आहेत. अनेकांच्या माना दुखावल्या आहेत. आजही या अवस्थेत फरक पडलेला नाही. हे दुखणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीस कधीच पडलेले नाही. बाजारपेठेत अधिकारी कधी फिरतीही करीत नाहीत. पावसाळ्यात तर अक्षरश: दलदल निर्माण झालेली असते. अशा स्थितीतच व्यापारी, हातगाडीवाले, भाजी विक्रेते व्यवसाय करीत असतात.
या भागाच्या नगरसेविका मेहजबीन सुभेदार, निलोफर आजरेकर यांनी वारंवार लक्ष्मीपुरीतील रस्त्यांसाठी आवाज उठविला. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुभेदार महासभेत भांडतात; परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे महिन्यापूर्वी येथील नागरिक, व्यापारी, विक्रेत्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हाही एक महिन्याभरात रस्त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. अद्याप त्यावर काहीच झालेले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक मात्र मोठ्या यातना भोगत आहेत.
माझे घर विका, पण रस्ता करा
रस्त्याच्या कामासाठी नगरसेविका मेहजबीन सुभेदार गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु जनतेच्या भावनेशी काहीही देणं-घेणं नसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सतत निधी नसल्याचे कारण देऊन टोलविले. एके दिवशी महापालिका सभेत सुभेदार संतापल्या. ‘तुम्हाला निधी उपलब्ध होणार नसेल तर माझे घर विका आणि रस्ता करा’, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांच्या नकारात्मकतेवर प्रहार केला होता, तेव्हा कुठे रस्त्यांची एस्टिमेट झाले आणि नवीन वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी धरण्याचे आश्वासन दिले गेले.
आश्वासन पाळले नाही
हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो मुख्य बाजारपेठेतील आहे यावर विश्वास बसत नाही. शहराच्या आमदारांनी आंदोलन केले नाही. मग नऊ वर्षे त्यांना का हा रस्ता दिसला नाही? रास्ता रोको केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत रस्ता करू, असे आश्वासन आमदारांना दिले; पण ते पाळले गेले नाही. ‘मी करतो मारल्यासारखे, तू कर रडल्यासारखे’ असा काही प्रकार आहे का, हेच कळत नाही. रस्ता लवकर करा हीच आमची मागणी आहे.
- जे. बी. कामत
लक्ष्मीपुरी
मार्चनंतर नगरसेवकपदाचा राजीनामा
लक्ष्मीपुरीतील रस्त्यांसाठी २८ लाखांचा खर्च येणार आहे. निधीची तरतूद नवीन अंदाजपत्रकात करून मार्चनंतर रस्ते केले जातील, असे अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. जर एप्रिलमध्ये रस्त्याची कामे सुरू झाली नाहीत तर आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ. जर तीन-तीन वर्षे सातत्याने भांडत असूनही रस्ता होणार नसेल तर नगरसेवकपदावर राहून तरी काय उपयोग?
- मेहजबीन सुभेदार,
नगरसेविका